Sat, Aug 24, 2019 21:12होमपेज › Konkan › हेवाळे परिसरात हत्तींचा धुडगूस सुरुच

हेवाळे परिसरात हत्तींचा धुडगूस सुरुच

Published On: May 25 2018 11:34PM | Last Updated: May 25 2018 10:00PMदोडामार्ग : प्रतिनिधी

हेवाळे-राणेवाडी परिसरातील केळी बागायतीमध्ये रानटी हत्तींचा धुडगूस सुरुच आहे. वनविभाग या हत्तीचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत असल्याने शेतकरी वनविभागाच्या विरोधात आमरण उपोषणाला बसणार आहेत. गुरुवारी रात्री सिद्धेश राणे,दत्ताराम देसाई यांच्या परिपक्व झालेल्या हजारो केळी जमीनदोस्त केल्याने त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

तिलारी खोर्‍यातील हत्ती संकट दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी स्थानिक शेतकरी देशोधडीला लागत आहे. हत्ती हटाव मोहीम राबविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून तेथील शेतकरी करत आहेत.  पण वनविभाग त्याबाबत गंभीर नाही तर लोकप्रतिनिधी  शेतकर्‍यांना आश्‍वासने देत हवेत ठेवून झुलवत ठेवत असल्याचा आरोप स्थानिक शेतकर्‍यांचा आहे. शासनाच्या या वेळकाढूपणाविरोधात बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय या शेतकर्‍यांनी घेतला आहे.

याबाबत शेतकर्‍यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेल्या अनेक वर्षांपासून जंगली हत्तीचा बंदोबस्त करण्यात राज्यशासन, वनविभाग अपयशी ठरले आहे. आज केळीच्या एका घडाला  बाजारात 600 ते 700 रूपये भाव मिळतो. मात्र हत्तीने नुकसान केले की वनविभाग फक्त 120 भरपाई देते. एका रात्रीत हत्ती लाखो रुपयांचे नुकसान करतात.लाखोच्या घरात नुकसान आणि शेकडो रुपयात मिळणारी भरपाई  हे समिकरण परवडणारे नाही. बँकेकडून कर्ज काढून केळी बागायती करायच्या आणि हातातोंडाशी आलेले पीक हत्तींकडून हिरावून घेतले जाणार. यामुळे आम्हा शेतकर्‍यावर आत्महत्त्या केल्याशिवाय पर्याय नाही. हत्ती हटाव मोहीम राबवा अन्यथा दोडामार्ग वनविभाग कार्यालयासमोर 11 जून रोजी आमरण उपोषणाला बसू असा इशारा निवेदनाद्वारे शेतकर्‍यांनी दिला आहे.