Wed, Apr 24, 2019 21:29होमपेज › Konkan › कोतवालांना ‘चतुर्थ श्रेणी’ दर्जा देण्याबाबत सरकार सकारात्मक

कोतवालांना ‘चतुर्थ श्रेणी’ दर्जा देण्याबाबत सरकार सकारात्मक

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 09 2018 8:53PM

बुकमार्क करा
दोडामार्ग : प्रतिनिधी

कोतवालांना एकछत्र योजनेतून  वगळून चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, या  मागणीसाठी  वारंवार अहवाल सादर करण्यात आले. याबाबत सरकार कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी मंत्रालयात  आयोजित बैठकीत दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य समन्वयक तथा राजाध्यक्ष गणेश इंगोले, सुनित गमरे आदी उपस्थित होते. भारतीय संघटना तज्ज्ञ व महाराष्ट्र राज्य संघटनेचे कायदेशीर सल्लागार सुरेश माने यांच्या माध्यमातून कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन  एकछत्र योजनेतून वगळण्यात यावे, ही मागणी गेल्या पन्नास वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहे.

 त्यासाठी राज्यातील कोतवालांनी  वेगवेगळी आंदोलने, उपोषणे केली. परंतू शासनाने त्याकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. कोतवालांना चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचार्‍याचा  दर्जा देण्यात यावा व कोतवालांना  एकछत्र योजनेतून वगळण्यात यावे, अशी मागणी कोतवाल संघटनेची आहे.   कोतवाल हे महसूल विभागातील  शेवटचे पद असून तलाठ्यांच्या कामात सर्व प्रकारची  मदत ते करत असतात. त्यामुळे कोतवाल  हा शासनाच्या महसूल कामांशी  बांधिल असल्याने इतर कर्मचार्‍यांच्या बरोबरीने  महसूलचे काम करीत असतो. पण शासन कोतवालांना पाच हजार रू. मानधन देते. हे मानधन तुटपुंजे असल्याचे कोतवालांचे म्हणणे आहे.

राज्याचे महसूलमंत्री, प्रधान सचिव  तसेच महसूल  व वनविभागाचे  सचिव यांच्यासोबत मंत्रालयात 3 जानेवारी 2018 रोजी बैठक झाली. या बैठकीत कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यासंदर्भातचा अहवाल पंधरा दिवसांत राज्य सरकार समोर सादर होणार आहे. सरकार कोतवालांना  चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक आहे, अशी माहिती  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत दिली.