Tue, Nov 13, 2018 02:31होमपेज › Konkan › जिल्हा उपाध्यक्षपदाचा लवकरच देणार राजीनामा!

जिल्हा उपाध्यक्षपदाचा लवकरच देणार राजीनामा!

Published On: Dec 16 2017 1:44AM | Last Updated: Dec 15 2017 9:34PM

बुकमार्क करा

दोडामार्ग : प्रतिनिधी

आपण गेली 27 वर्षे भाजपाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम  करत आहे. तालुक्यात भाजप पक्ष शून्यातून वाढविला. पण  अलिकडे पक्षातीलच काही आजी-माजी पदाधिकारी पक्ष संपविण्याचे काम करीत आहेत, असा खंत वजा आरोप भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केला. माटणे पं. स. गणाच्या पोटनिवडणूकीमध्ये आलेले अपयश लक्षात घेऊन आपण जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा लवकरच देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 दोडामार्ग तालुका भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये  श्री. म्हापसेकर बोलत होते.  तालुका उपाध्यक्ष शंकर देसाई, पं. स. सदस्य बाळा नाईक, चंदू मळीक, सुनील गवस आदी उपस्थित होते. 

श्री. म्हापसेकर म्हणाले, माटणे पं. स. पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला अपयश आले, जनतेने दिलेला हा कौल आम्ही मान्य करतो. या निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे असे सर्व विरोध एक झाले होते.  मला त्याबाबत काही म्हणायचे नाही, कारण ते विरोधकच आहेत.  मात्र भाजप मधीलच काही गद्दार आजी-माजी पदाधिकार्‍यांनी विरोधकांना साथ दिली, म्हणूनच आम्हाला पराभव स्विकारावा लागला. असा दावा त्यांनी केला. 

 दुःख एवढ्याच गोष्टीचे वाटते की मी तालुक्यात भाजपचे गेली 27 वर्षे प्रामाणिकपणे कामे करून पक्ष वाढवित आहे तर दुसरीकडे पक्षातील गद्दार पदाधिकारी पक्ष कमकुवत करीत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मी प्रत्येक वेळी स्थानिकांना उमेदवारी देतो. 

 रूपेश गवस यांना उमेदवारी दिली होती. मागच्या निवडणुकीत जी मते भाजपाला मिळाली त्यात आणखी भर पडली, मात्र त्याचे विजयात रुपांतर न झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.  

 शिवसेनेचे विजयी उमेदवार बाबुराव धुरी यांनी प्रचारादरम्यान भरमसाठ आश्‍वासने मतदारांना दिली आहेत. याची पूर्तता त्यांनी करावी आणि विकास कामेही मार्गी लावावित, असे आवहन त्यांनी श्री. धुरी यांना केले.  मी सुध्दा जि. प. सदस्य असल्याने या भागाचा  विकास करण्यास कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले.