Sun, Jul 21, 2019 02:13होमपेज › Konkan › आडाळी एमआयडीसी क्षेत्रात नॉलेज हब

आडाळी एमआयडीसी क्षेत्रात नॉलेज हब

Published On: Jul 18 2018 10:41PM | Last Updated: Jul 18 2018 9:56PMदोडामार्ग : प्रतिनिधी

आडाळी एमआयडीसी जमीन क्षेत्रात लवकरच नॉलेज हब होणार आहे. यामुळे देश पातळीवरील शिक्षण आणि भविष्यात येथे प्रशिक्षण व कौशल्य घेतलेले सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. बुधवारी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून देशातील नावाजलेली फुटवेअर डिझायनिंग अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालक अरुण कुमार यांनी भेट देत पाहणी करत नॉलेज हब उभारण्याची घोषणा केली. 

दिल्ली येथे केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांची 11 जुलै रोजी भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली, जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी भेट घेतली होती.  या भेटीत उद्योगमंत्री यांच्याशी सिंधुदुर्गात रोजगाराभिमुख उद्योग, व्यवसाय उभारणीबाबत चर्चा झाली होती. 

यावेळी आपल्या उद्योग विभागाची समिती आडाळी येथे एमआयडीसी येथे जागा पाहणी आणि उद्योग व्यवसायाबाबत काय करता येईल काय, याबाबत समितीचा दौरा त्यांनी भेटीदरम्यान निश्‍चित केला होता. यानुसार बुधवारी दिल्ली येथील देशातील नावाजलेली फुटवेअर डिझायनिंग अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक अरूण कुमार, कार्यकारी संचालक विजय सिंघ, इंडियन इन्स्टिट्युटचे सहसंचालक अमित सिंगला यांच्यासोबत एमआयडीसी रत्नागिरी कार्यकारी अभियंता परशुराम करावडे, प्रादेशिक  अधिकारी एस. आर. बर्गे, कुडाळ कार्यालयातील एमआयडीसी अविनाश रेवंडकर यांनी आडाळी येथील एमआयडीसी जागेची नॉलेज हबसाठी पाहणी केली. हे हब उभारण्यासाठी 40 एकर जागा उपलब्ध एमआयडीसीने करून  दिले पाहिजे. जागा हस्तांतरण झाली की दोन वर्षांत 150 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येईल. मुंबई येथे एमआयडीसीच्या सीईओ यांच्याशी येत्या दोन दिवसात संयुक्त बैठक घेऊन आडाळी येथील 40 एकर जागा उपलब्ध करून द्या, याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे अरूण कुमार यांनी सांगितले.  इंडियन इन्स्टिट्युटच्या वतीने आडाळीत पॅकेजिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. 

ग्रा. पं. सभागृहात व्यवस्थापकीय संचालक अरूण कुमार ग्रामस्थांना नॉलेज हब बाबत मार्गदर्शन करताना म्हणाले की, देशभरात एमआयडीसीच्या बारा संस्था आहेत. या संस्थेच्या महाराष्ट्रात आडाळी येथे होणारी पहिली संस्था असून जागा ही या प्रकल्पाला उत्कृष्ट आहे. फक्त एमआयडीसी हस्तांतरित करून आम्हाला दिली की आम्ही दोन वर्षात या ठिकाणी शैक्षणिक संकुल उभारू. या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या युवत-युवतींना येथेच किंबहुना बाहेरसुध्दा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. संस्थेत फुटवेअर, लेदर, रिटेल, फॅशन डिझायनींगचे प्रशिक्षण देऊन कौशल्य घेतलेले युवक-युवती यांना अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे ते म्हणाले. 

जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर म्हणाले, केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्गात 25 वेगवेगळे प्रकल्प आणण्याचा संकल्प केला असून आम्ही दिल्ली येथे त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होते. तेव्हा आमच्यासमोर विविध प्रकल्पाविषयी त्यांनी सादरीकरण केले होते. याचाच एक भाग म्हणून आडाळी येथे या समितीने पाहणी केली. निश्‍चितच येथील तरूणांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाईल आणि खर्‍या अर्थाने एमआयडीसी जमीन क्षेत्रात यापुढे शैक्षणिक संकुलामुळे मोठा बदल झालेला पहावयास मिळेल. विशेष करून माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांचे श्री. म्हापसेकर यांनी आभार मानलेत. कारण त्यांच्यामुळे आडाळीमध्ये एमआयडीसी घोषित झाली. 

सहसंचालक अमित सिंगला यांनी मनोगत व्यक्त केले. आडाळी सरपंच उल्का गांवकर, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते. एमआयडीसी जमीन क्षेत्रात प्रत्यक्ष जात पाहणी केली. त्यातच वीज, रस्ता, पाणी याची उपलब्धता आहे काय? याबाबत देखील माहिती जाणून घेतली. या जमीन क्षेत्राच्या आत जाणार्‍या उजव्या बाजूची जागा दिल्ली येथून आलेल्या समितीला योग्य वाटली आहे. एमआयीडीसी ही जागा हस्तांतरण केल्यावर शैक्षणिक संकुल उभारणीच्या कामाला गती येणार आहे.