होमपेज › Konkan › दारूविक्री बंद न झाल्यास पोलिस ठाण्यावर मोर्चा

दारूविक्री बंद न झाल्यास पोलिस ठाण्यावर मोर्चा

Published On: Feb 13 2018 2:02AM | Last Updated: Feb 12 2018 10:55PMदोडामार्ग : प्रतिनिधी

कोनाळकट्टा येथे रस्त्यालगत असलेल्या दारू अड्डयावर पोलिसांच्या कृपाशीर्वादामुळे लपून-छपून दारू विक्री सुरु आहे. ही दारू बंद न झाल्यास बुधवार 21 फेबु्रवारी  रोजी पोलिस ठाण्यावरच धडक मोर्चा काढला जाईल, असा इशारा कोनाळ येथील महिलांनी पोलिस निरीक्षक सुनील घासे यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,कोनाळकट्टा येथे दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गावर राजरोसपणे दारू विक्री केली जात होती. याबाबत पोलिस ठाण्यात भेट घेत अशा दारू अड्डयावर कारवाई करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर स्वतः महिलांनी दारू पकडून पोलिसांना दिली होती. पण पोलिसांचाच कृपाशिर्वाद अशा व्यावसायिकांना असल्याने अजूनही या भागात लपून-छपून दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. 

गावात दारूबंदीसाठी महिलांनी एकजुटीने लढा उभारला आहे. ग्रा.पं.मध्ये देखील दारू बंदीचा ठराव घेतला आहे. असे असतानाही दारू व्यावसायिक राजरोसपणे दारू विक्री करत आहे.  हे दारूअड्डे पूर्णपणे बंद न झाल्यास दारू  अड्डयांवर चाल करून पोलिसांचे काम आम्ही करणार आहोत. 

यावेळी शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी पोलिस यंत्रणेची राहील. तसेच दारू बंदीबाबत पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा काढला जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी विनिता घाडी, मनाली शेलार, रूपाली धुरी, शारदा जाधव, अश्‍विनी  घोडगेकर, विजया आचरेकर आदींसह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.