Fri, Jul 19, 2019 07:42होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात डॉक्टरांच्या १९८ मंजूर पदांपैकी तब्बल १०५ पदे रिक्‍त!

सिंधुदुर्गात डॉक्टरांच्या १९८ मंजूर पदांपैकी तब्बल १०५ पदे रिक्‍त!

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 09 2017 1:44AM

बुकमार्क करा

सिंधुदुर्गनगरी : लवू म्हाडेश्‍वर 

सिंधुदुर्ग हा निसर्गरम्य पर्यटन जिल्हा व 100 टक्के साक्षरता असलेला जिल्हा म्हणून संपूर्ण देशात परिचित आहे. मात्र, या सुशिक्षित जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आपल्याकडील तुटपुंज्या मनुष्यबळावर जिल्हावासीयांचे आरोग्याचे रक्षण करत आहे. जिल्हा रुग्णालयासह उप आणि ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि उप प्राथमिक केंद्र अशा सर्व आरोग्य केंद्रांमधून तज्ज्ञ डॉक्टर नसतानाही रुग्णांना जास्तीत जास्त चांगली रुग्णसेवा जिल्हा आरोग्य विभागाकडून दिली जात आहे.डॉक्टरांच्या एकूण 198 मंजूर पदांपैकी तब्बल 105 एवढी पदे रिक्‍त आहेत.

पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘स्वच्छ जिल्हा’ म्हणूनही  किताब मिळाला आहे. मात्र, सद्यस्थितीत जिल्ह्यात आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मलेरिया,स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू याचबरोबर माकडताप यासारखे अचानक उद्भवणारे आजारही समोर येत आहेत. यातच अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा तेवढीच सक्षम असणे आवश्यक आहे.

डॉक्टरांची तब्बल 105 पदे रिक्‍त

जिल्हा रुग्णालयाअंतर्गत वर्ग 1 ची 28 पदे मंजूर असून यापैकी केवळ 10 पदे भरलेली आहेत.तर 16 पदे रिक्‍त आहेत. वर्ग 2 ची 95 पदे मंजूर असून यातील 49 पदे भरलेली 46 पदे रिक्‍त आहेत. जिल्हा रुग्णालयांतर्गत 3 उपजिल्हा आणि 7 ग्रामीण रुग्णालये मिळून एकूण 11 रुग्णालय आहेत. यातील जिल्हा रुग्णालयात वर्ग 1 ची 18 पदे मंजूर असून यातील केवळ 5 पदे भरलेली आहेत. तर वर्ग 2 ची 32 पदे मंजूर असून यातील फक्‍त 23 पदे भरलेली आहेत. या रुग्णालयांतर्गत अतिरिक्‍त जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी बाह्य संपर्क अधिकारी, फिजिशियन, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थिव्यंग, रेडियोलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक ही सर्व वर्ग 1 ची पदे रिक्‍त आहेत. 

जि.प.आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यात 38 प्रा.आ.केंद्रांमध्ये केवळ 44 पदे भरलेली आहेत. तर जि.प.चे 9 दवाखाने असून यात 10 डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ 4 पदे भरलेली आहेत. जिल्ह्यात एकूण 248 आरोग्य उपकेंद्रांमध्ये 248 एएनएम पदे मंजूर असून यापैकी केवळ 18 पदे भरलेली आहे. तर180 एमपीडब्ल्यू मंजूर असून यातील केवळ 23 पदेच भरलेली आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणेबरोबरच एक आयुर्वेदिक, एक होमिओपॅथिक महाविद्यालय तसेच 333 खाजगी दवाखानेही जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेत रुजू आहेत.