Mon, Aug 26, 2019 08:21होमपेज › Konkan › सागरी जैविक केंद्र ‘बुडाले’ मालकी हक्कात

सागरी जैविक केंद्र ‘बुडाले’ मालकी हक्कात

Published On: May 16 2019 2:06AM | Last Updated: May 16 2019 2:06AM
रत्नागिरी : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत भाट्ये येथील किनारपट्टी व सागरी जैविक विविधता केंद्राचे सुरू असलेले काम गेल्या तीन वर्षांपासून जागेच्या मालकी हक्काच्या वादात बंद पडले आहे. मत्स्य संशोधनासाठी उभारण्यात आलेल्या या केंद्रात सध्या प्राध्यापक तर नाहीतच; परंतु तंत्रज्ञही यायला तयार नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

सन 1970 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे हे सागरी संशोधन केंद्र रत्नागिरीमध्ये सुरू आहे. या विभागाचे तत्कालीन दिवंगत प्रा. माने यांनी या विभागाला नावारूपाला आणले. मागील पंधरा ते वीस वर्षांत अनेक विद्यार्थ्यांनी संशोधन करून, किनारपट्टीवर नवनवीन प्रजातींचा शोध लावला व डॉक्टरेटही मिळवली. दिवंगत प्रा. माने यांच्यानंतर विद्यापीठाचेही या संशोधन केंद्राकडे दुर्लक्षच झाल्याचे  चित्र दिसत आहे. भाट्ये येथे सध्या भाडेतत्त्वावरील इमारत उभी असून, दोन शिपाई कार्यरत आहेत. केंद्राचा कार्यभार औरंगाबाद येथीलच प्राध्यापकांकडे तात्पुरता देण्यात आलेला आहे. 

कोकणातील जैवविविधतेसह मत्स्य उत्पादनावर संशोधन करण्यासाठी किनारपट्टी व सागरी जैविक विविधता केंद्राची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात विद्यापीठाअंतर्गत अनेक अभ्यासक्रम या केंद्रामार्फत चालविले जात होते. खाडी किनारी असलेली जैवविविधता, माशांच्या नवनवीन प्रजाती, कोळंबी पालन, मासे सुकविण्याच्या नवनवीन पध्दती यावर संशोधन केले जात होते. परंतु गेले तीन वर्षे या केंद्राचे काम ठप्प झाले आहे.

केंद्रात असणारे अस्थायी कर्मचारी देखील विविध ठिकाणी कायमस्वरुपी सेवेत गेल्याने येथे नव्याने कर्मचार्‍यांची नियुक्ती झालेली नाही. रत्नागिरीसह कोकणातील छोट्या मत्स्य व्यावसायिकांना येथील संशोधनाचा फायदा व्हावा या हेतूने या केंद्राची स्थापना करण्यात आली होती. परंतु त्याचे कामकाज ठप्प असल्याने केंद्राचा फायदा येथील मच्छीमारांना होताना दिसत नाही. 

जागेचा वादही या केंद्राच्या मुळावर आला आहे. त्यामुळे केंद्राच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे. केंद्र उभी असलेली जागा महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहे. ही जागा विद्यापीठाकडे वर्ग केल्याशिवाय तेथे निधी खर्च करणे कठीण आहे. विद्यापीठाकडून केंद्राच्या पुनर्स्थापनेबाबत हालचाली सुरू आहेत.

केंद्र सुरू होण्याची गरज

औरंगाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांची टीम पीएच.डी. संशोधनासाठी रत्नागिरीत दाखल होणार आहे. परंतु, तात्पुरत्या स्वरूपाचे संशोधन करण्यापेक्षा केंद्र कायमस्वरूपी सुरू करून नवीन संशोधन करण्याची मागणी होत आहे. मत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्याचा घाट घातला जात असताना औरंगाबाद विद्यापीठांतर्गत असलेले किनारपट्टी व सागरी जैविक विविधता केंद्रही सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.