Mon, Aug 19, 2019 17:31होमपेज › Konkan › ‘पदवीधर’ निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडाळी

‘पदवीधर’ निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडाळी

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 07 2018 10:37PMखेड : प्रतिनिधी

कोकण पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या पाठीमागे लागलेले शुक्लकाष्ट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. खेड येथील राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य नफीसा परकार यांचे पती व राष्ट्रवादीतील कार्यकर्ते हशमत परकार यांनी बुधवार दि. 6 रोजी पक्षाचे आमदार व तिकीट वाटपाबाबत जाहीर नाराजी व्यक्त करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

परकार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारालाच त्याचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट आहे. परकार यांनी बंडाचा झेंडा उगारल्याने आगामी काही दिवसांत राष्ट्रवादीतील नाराजांचा गट अधिक सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेने संजय मोरे, भाजपने निरंजन डावखरे यांना तर राष्ट्रवादीने नजीब मुल्ला यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कोकण पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी निवडणुकीपूर्वीच राजीनामा देऊन थेट भाजपत प्रवेश केला. त्यानंतर भाजपनेदेखील त्यांना उमेदवार म्हणून घोषित केले. राष्ट्रवादीने डावखरे यांच्या विरोधात जास्त आगपाखड न करता मुल्ला यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु, राष्ट्रवादीतील नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे.

हशमत परकार यांनी बुधवार दि. 6 रोजी आपण कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करत उमेदवारी अर्जदेखील घेतला आहे. याबाबत भूमिका स्पष्ट करताना परकार म्हणाले, कोकणातील गरीब पदवीधर उमेदवार या निवडणुकीत निवडून येणार नाही का? कोकण पदवीधर मतदारसंघात पक्षाने कोकण म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालगड येथील उमेदवार का दिला नाही? नेहमी ठाण्याला उमेदवारी कशासाठी? असा सवाल केला आहे.