Sun, Aug 18, 2019 20:37होमपेज › Konkan › भूकंप वर्षा मुळे कोकणसह प. महाराष्ट्रात घबराट

भूकंप वर्षा मुळे कोकणसह प. महाराष्ट्रात घबराट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : समीर जाधव

जगविख्यात भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडोम्स याने 2018 हे वर्ष ‘भूकंप वर्ष’ घोषित केले आहे. चौदाव्या शतकात त्याने ही भविष्यवाणी केली होती. आता जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनीही याला दुजोरा दिला असून 2018 मध्ये तीव्र आणि सर्वाधिक भूकंप होतील, असा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोयना भूकंपप्रवण क्षेत्रांतर्गत येणार्‍या कोकण आणि प. महाराष्ट्रात घबराट निर्माण झाली आहे. या दृष्टीने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शासकीय स्तरावरही हालचाली सुरू झाल्या आहेत. 

जगविख्यात भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडोम्स  याने अनेक भाकिते वर्तवली. त्यामध्ये त्याची भाकिते बहुतांश खरी ठरली आहेत. लेडी डायनाचा मृत्यू, हिटलरचा उदय, अणूबॉम्ब, दुसरे महायुद्ध, 2016 मधील अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवड ही भाकिते खरी ठरली आहेत. याशिवाय आपल्या मृत्यूबाबतचे त्याने केलेले भाकित खरे ठरले. 

महाराष्ट्राला धोका नाही...चिपळूण : पृथ्वीचा वेग मंदावल्याने ही परिस्थिती ओढवणार आहे. भूकंप, ज्वालामुखीसारखे प्रकार घडणार असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. 25 वर्षांच्या अंतरानंतर पाच वर्षांमध्ये पृथ्वीची गती कमी-कमी होत जाते. ही गती कमी होण्याचे 2018 हे पाचवे वर्ष आहे. त्यामुळे पृथ्वीवर दाब वाढून मोठे भूकंप होतील, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, या भूकंपाचा धोका काश्मीर, बांग्लादेश व चीनच्या सीमा भागाला बसणार आहे. महाराष्ट्रात धोका जाणवणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

कोयना भूकंप प्रवण क्षेत्राचा इतिहास लक्षात घेता या भागात 1963 पासून आतापर्यंत मध्यम स्वरूपाचे नऊ भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये सर्वात मोठा धक्का 11 डिसेंबर 1967 रोजी 6.7 रिश्टर स्केलचा झाला. यामध्ये अनेकांनी प्राण गमावले व मोठी वित्तहानी झाली. या भूकंपाचा धोका लक्षात घेऊनच कोयना प्रकल्पातील कर्मचार्‍यांनी चिपळूण तालुक्यातील पोफळी, अलोरे येथे आश्रय घेतला.

कोयनेजवळ नेहमीच भूकंपाचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्याचा हादरा सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांत बसलेला आहे.  1967 ते 2017 या कालावधीत कोयना परिसरात तब्बल 1 लाख 20 हजार 315 भूकंप झाले आहेत. यामध्ये 3 रिश्टर स्केलपेक्षा कमी 1,18,563, 3 ते 4 रिश्टर स्केलमध्ये 1647, 4 ते 5 मध्ये 96 तर मध्यम स्वरूपाचे नऊ धक्के झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर कराड येथे नॅशनल जीओ-फिजिकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून भूकंपाचे पूर्वानुमान कसे होईल, यासाठी संशोधन सुरू आहे. 

या पार्श्‍वभूमीवर 2018 हे वर्ष कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्राला भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून कसे जाईल, याबाबत पोटात भितीचा गोळा उठला आहे. याला शास्त्रीय आधार असल्याने 2018 मध्ये अशी आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर कोणती खबरदारी घ्यायची या संदर्भात प्रशासकीय पातळीवर आत्तापासूनच विचारविनिमय सुरू झाला आहे.