Thu, Apr 25, 2019 21:56होमपेज › Konkan › देवरूखनजीक एस.टी.-कार अपघातात महिलेचा मृत्यू

देवरूखनजीक एस.टी.-कार अपघातात महिलेचा मृत्यू

Published On: Jan 02 2018 1:09AM | Last Updated: Jan 01 2018 10:02PM

बुकमार्क करा
देवरूख : प्रतिनिधी

देवरूख-संगमेश्‍वर मार्गावरील कोसुंब येथे सोमवारी झायलो कारची एस.टी. बसला जोरदार धडक बसून, झालेल्या अपघातात कारमधील एका वृद्धेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली. या अपघातात एस.टी. बसमधील 4, तर कारमधील 4 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जणांना गंभीर दुखापत असल्याने त्यांना अधिक उपचारांसाठी मुंबईला हलविण्यात आले आहे.

या संदर्भात एस.टी. चालक संदीप पाटील यांनी देवरूख पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. पाटील हे साखरपा-ठाणे  (एम.एच. 20 बीएल 3049) ही एस.टी. बस घेऊन देवरूखहून सकाळी संगमेश्‍वरच्या दिशेने निघाले होते. ही एस.टी. बस कोसुंब येथील मारुती स्टॉपजवळ आली असता, संगमेश्‍वरहून देवरूखच्या दिशेने येणार्‍या (एम.एच. 04, इएफ 7909) झायलो कारने दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार्‍या बसला धडक दिली. हा अपघात सोमवारी सकाळी 9 वा.च्या सुमारास घडला. अपघातात झायलोचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त करोगल कुुटुंबीय हे 
मार्लेश्‍वर, गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आले असता हा अपघात झाला.

या अपघातात कारमधील रजनी रमेश करोगल (वय 63, रा. डोंबिवली, मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रमेश अण्णाजी करोगल (75) व झायलोचालक सूरज गुप्ता (25) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात सुरेश दळवी (62), वैशाली सावंत (55), अनिता खेडेकर (66), रवींद्र बने (66) या एस.टी. बसमधील, तर दिलीपकुमार बबलानी, गुरुराज करोगल (36), धनश्री करोगल (33), पवन कुरवीनकुप (24) या झायलो कारमधील प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत. जखमींना उपचारासाठी तत्काळ देवरूख येथील ग्रामीण रुणालयात दाखल करण्यात आले. डॉ. संदीप माने व सहकार्‍यांनी जखमींवर उपचार केले.