होमपेज › Konkan › संगमेश्‍वर ‘ग्रामीण’मधील सोनोग्राफी मशीन गायब 

संगमेश्‍वर ‘ग्रामीण’मधील सोनोग्राफी मशीन गायब 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

देवरूख : वार्ताहर

मुंबई -गोवा महामार्गावरील संगमेश्‍वर ग्रामीण रूग्णालयात असलेले सोनोग्राफी मशीन अचानक गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे अत्याधुनिक मशीन गायब झाल्यामुळे गर्भवती महिलांवर तपासणीसाठी खासगी दवाखान्यात जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रकाराबाबत संगमेश्‍वरवासीय आक्रमक झाले असून याची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या ग्रामीण रूग्णालयात गर्भवती महिलांसाठी अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनची सुविधा शासनाकडून उपलब्ध करण्यात आली होती. ही सुविधा अत्यल्प दरात असल्यामुळे याचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना होत होता. डॉ. अजय सानप हे वैद्यकीय अधीक्षक असताना हे मशीन रूग्णांसाठी उपलब्ध होते. मात्र, 2015 पासून हे मशिन अचानक गायब झाल्याने खेडोपाड्यांतील गर्भवती 
महिलांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. 

संगमेश्‍वर ग्रामीण रूग्णालय हे मुंबई -गोवा महामार्गालगत असल्या मुळे या रूग्णालयात रूग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात दाखल होत  असतात. या रूग्णालयात चांगल्याप्रकारे सुविधा मिळत असल्यामुळे रूग्णांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. 

संगमेश्‍वर पट्ट्यातील गावे ही डोंगर दर्‍यांमध्ये वसलेली असल्यामुळे येथील रूग्ण अधिकाधिक ग्रामीण रूग्णालयाचा आधार घेत असतात.  ग्रामीण भागातील गर्भवती महिलांची अत्यल्प दरात तपासणी व्हावी, याकरिता शासनाकडून या रूग्णालयात अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन देण्यात आले होते. याचा फायदा ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना होत होता. मात्र, अचानकपणे हे मशीन गायब झाल्याने गर्भवती महिलांना खासगी दवाखान्यात जावे लागत आहे. याठिकाणी अशा महिलांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे गायब झालेल्या सोनोग्राफी मशीनचा ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना लाभ घेता यावा, यासाठी या मशीनचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. या मशीनचा शोध लागला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा संगमेश्‍वरवासीयांनी दिला आहे.