Wed, Feb 26, 2020 09:21होमपेज › Konkan › साडवलीत नेव्ही सामुग्रीचे देशातील पहिले प्रदर्शन 

साडवलीत नेव्ही सामुग्रीचे देशातील पहिले प्रदर्शन 

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 13 2017 12:03AM

बुकमार्क करा

देवरुख : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली तर कान्होजी आंग्रे यांनी या आरमाराचे नेतृत्व करुन स्वराज्य उभारणीत योगदान दिले. हडप्पा संस्कृतीपासून समुद्रप्रवास सुरु झाला आहे. ओडीसातील लोकांनी मान्सून वार्‍याचा अंदाज घेऊन शिडाच्या होड्यांनी प्रवास केला. तर चोला राजाने आग्नेय आशिया ही स्वारी 11 व्या शतकात केली,  ही खरी आरमाराची सुरुवात आहे. असाच नेव्हीचा प्रवास व इतिहास शोधण्याचे काम मेरिटाइम  हिस्ट्री करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे साडवलीमध्ये देशातील पहिले नेव्ही सामुग्रीचे पहिलेच प्रदर्शन आहे, असे मत कमांडर वोडोक्कल जॉन्सन यांनी व्यक्त केले.

साडवली येथे पी. एस्. बने इंंटरनॅशनल  स्कूलमध्ये  हे प्रदर्शन भरवण्यात  आले आहे. दिल्ली येथील मेरिटाइम हिस्ट्री व  कसबा इन्स्टिट्यूट  यांचे  यासाठी सहकार्य लाभले. भारतीय युद्धात नेव्हीचे योगदान मोठे आहे.विविध युद्धांत वापरण्यात आलेली व शत्रूकडून मिळवलेली युद्धसामुग्री या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी कमांडर वोडोक्कल जॉन्सन, आयोजक सुभाष बने, रोहन बने, जि.प.उपाध्यक्ष संतोष खेराडे, शिक्षण विभागाचे शिवाजी देसाई, तहसीलदार संदीप कदम यांसह  विविध मान्यवर उपस्थित होते.

नेव्हीमधील युद्धसामुग्री प्रदर्शनात 1961, 1971 अशा अनेक युद्धाप्रसंगी वापरण्यात आलेल्या आयुधांची विद्यार्थ्यांनी माहिती करुन घेतली. भारतीय नौदलाची स्थापना 1934 साली झाली. नेव्हीचे बोधचिन्ह, विविध ध्वज, धडाडीच्या सेनापतींचा इतिहास, वापरण्यात आलेली क्षेपणास्त्रे, युद्ध नौकांचा इतिहास, आयएनएस विराट, डेलीक्लास, त्रिशुळ, तसेच पाणबुड्यांचा इतिहास या प्रदर्शनातून उलगडला गेला. कमांडर वोडोक्कल यांनी देवरुख साडवली परिसराचा शैक्षणिक वारसा लक्षात घेता भारतीय संस्कृतीत ज्ञानाला महत्त्व असल्याने हे प्रदर्शन पहिले साडवली येथे घेतल्याचे विशेष नमूद  केले.  नेव्हीमध्ये अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध असून देशसेवा करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे आवाहन केले. सामुद्रीक युद्ध सामुग्रीचा इतिहास प्रदर्शनाच्या माध्यमातून सांगण्यासाठी देवरुख आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या चाळीस मुलांनी जबाबदारी पार पाडली. हे प्रदर्शन मंगळवार, बुधवार असे दोन दिवस आहे.