Mon, Apr 22, 2019 03:57होमपेज › Konkan › देवरूखात ‘स्वाभिमान’ ठरणार अनेकांची डोकेदुखी

देवरूखात ‘स्वाभिमान’ ठरणार अनेकांची डोकेदुखी

Published On: Mar 20 2018 10:50PM | Last Updated: Mar 20 2018 10:50PMदेवरूख : नीलेश जाधव

येथील नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकीची रंगत आणखीनच वाढली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रथमच ताकदीनिशी उतरला असल्याने या पक्षाकडे सार्‍यांच्याच नजरा लागल्या आहेत. 

त्यामुळे हा पक्ष इतर राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. नवख्या स्वाभिमान पक्षामुळे मतविभाजन होणार असल्याची अटकळ बांधली जात असून या मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. 

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. यानंतर नारायण राणे यांना मानणार्‍या कार्यकर्त्यांनीही स्वाभिमानची वाट धरली आहे. राज्याच्या राजकारणात स्वाभिमान पक्ष नव्याने दाखल झाला आहे. त्यामुळे साहजिकच सर्वांच्याच नजरा या पक्षाकडे वळल्या आहेत. आता देवरूख नगरपंचायतीच्या दुसर्‍या निवडणुकीत स्वाभिमान पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरला आहे. काही दिवसांपूर्वी स्वाभिमानचे सरचिटणीस व माजी खासदार नीलेश राणे यांनी न. पं. निवडणुकीच्या पाश्वभूमीवर देवरूखात स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. 

या बैठकीनंतर स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून प्रथमच निवडणूक लढत असलेल्या स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा विडाच उचलला आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांसमोर नवख्या स्वाभिमान पक्षाचे या निवडणुकीत आव्हान असणार आहे.

गत निवडणुकीसारखेच याही निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, कुणबी सेना, बहुजन विकास आघाडी, जनता दल हे पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मात्र न. पं. च्या या दुसर्‍या निवडणुकीत नवख्या स्वाभिमान पक्षाने उडी घेत सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्‍का दिला आहे. 

यावेळी मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी, कुणबी सेना, बहुजन विकास आघाडी व जनता दल या पक्षांनी एकत्र येत महाआघाडीद्वारे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजप व शिवसेना हे दोन पक्ष या निवडणुकीत स्वतंत्र लढणार आहेत. त्यातच स्वाभिमान पक्ष ही निवडणूक स्वतंत्र लढत असल्यामुळे निवडणुकीची रंगत आणखीनच वाढली आहे. निवडणुकीचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना स्वाभिमान पक्षाने ही निवडणूक लढवून सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, कुणबी सेना, बहुजन विकास आघाडी व जनता दल हे पक्ष एकत्रित निवडणूक लढवीत आहेत तर दुसरीकडे भाजप व शिवसेना हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या सर्व पक्षांचे कडवे आव्हान नवख्या स्वाभिमान पक्षासमोर असणार आहे. तर स्वाभिमानने या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरून सर्वच राजकीय पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. 

स्वाभिमान पक्षाने या निवडणुकीत आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले अशसल्याने या निवडणुकीत आपले उमेदवार जिंकून आणायचे, हा स्वाभिमान पक्षाचा मनसुबा आहे. त्यामुळे या निवडणुकीत इतर पक्षांनी स्वाभिमानला दुर्लक्षित करून चालणार नाही. दुसरीकडे स्वाभिमानला या निवडणुकीत कितपत यश मिळते व स्वाभिमान पक्ष करिष्मा करणार का, हेही पाहणे तितकेच औत्सुक्याचे ठरणार आहे.