Tue, Jul 23, 2019 11:10होमपेज › Konkan › माळवाशीच्या माजी विद्यार्थ्यांचे असेही दातृत्व

माळवाशीच्या माजी विद्यार्थ्यांचे असेही दातृत्व

Published On: Feb 04 2018 11:24PM | Last Updated: Feb 04 2018 9:07PMदेवरूख : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व डिजिटल पद्धतीने शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी हायस्कूलचे माजी विद्यार्थी सरसावले. त्यांनी स्वखर्चातून माळवाशी हायस्कूलला प्रोजेक्टर दिला. माजी विद्यार्थ्यांच्या या दातृत्वामुळे येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता डिजिटल पद्धतीने  शिक्षण घेता येणार आहे.

न्यू  इंग्लिश स्कूल वाशी तर्फ देवरूख (माळवाशी) हे ग्रामीण भागात वसले आहे. खडतर परिस्थितीत येथील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण घेता यावे, यासाठी येथील माजी विद्यार्थ्यांनी संघटना उभारत आर्थिक रक्कम जमा केली आणि त्यातून हायस्कूलसाठी प्रोजेक्टर देणगी स्वरूपात दिली. आपल्या हायस्कूलच्या विविध गरजा पूर्ण करण्याचा निर्धारही संघटनेने केला आहे. माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या कार्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाला सरपंच रवींद्र वास्कर, उपसरपंच सुनील सावंत, तंटामुक्तीचे अध्यक्ष चंद्रकांत कडू, मुख्याध्यापक विजय नगरकर, शिक्षक पालक संघाचे मधूकर करंडे, प्रकाश करंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी मागील वर्षी वह्या वाटपाचा  कार्यक्रम केला होता. आगामी काही वर्षात संपूर्ण विद्यालय डिजिटल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी विद्यार्थी बहुउद्देशीय संघटनेचे स्वप्निल करंडे, अक्षय कांबळे, ऋषभ कांबळे, विशाल भडवळकर, दीपक वास्कर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना आता डिजिटल धडे गिरवता येणार असल्याने पालकांनीही समाधान व्यक्त केले.