होमपेज › Konkan › कोकणातील पहिल्या शहीद जवान स्मारकासाठी रणगाडा मंजूर

कोकणातील पहिल्या शहीद जवान स्मारकासाठी रणगाडा मंजूर

Published On: Dec 14 2017 1:45AM | Last Updated: Dec 13 2017 10:57PM

बुकमार्क करा

देवरुख : प्रतिनिधी

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोकणातील पहिल्या शहीद जवान स्मारक व परमवीर चक्र दालनासाठी संरक्षण मंत्रालयाकडून वीर ट्रॉफी म्हणून रणगाडा मंजूर झाला आहे,अशी माहिती अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली.

आपल्या देशाचे सीमेपलीकडील व सीमांतर्गत शत्रूकडून सर्वकाळ संरक्षण करणार्‍या शूर सैनिकांना मानवंदना म्हणून यासाठी सर्वोच्च बलीदान देणार्‍या शहीद जवानांप्रती श्रद्धांजली वाहण्याच्या तसेच कोकणातील सर्व तरुण वर्गाला प्रेरणा मिळण्याच्या हेतूने स्वर्गीय काकासाहेब पंडित शैक्षणिक संकुलात देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ शहीद जवान स्मारक, परमवीर चक्र दालन उभे करत आहे. यासाठी वीर ट्रॉफी म्हणून युद्धात वापरलेला रणगाडा प्राप्त झाला आहे.

संपूर्ण देशामध्ये यावर्षी फक्त दोनच संस्थांना हा रणगाडा मंजूर करण्यात आला आहे. त्यात देवरुखची ही संस्था असल्याने देवरुखवासीयांचा हा गौरव झाला आहे. यासाठी संस्था उपाध्यक्ष मदन मोडक यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. या स्मारकाच्या माध्यमातून आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांना व स्मारक पाहण्यासाठी येणार्‍या प्रत्येकालाच देशभक्ती व देशासाठी त्याग करायची प्रेरणा मिळत रहाणार आहे. याबरोबरच शहीद स्मारक समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सैन्य शिक्षण घ्यावे व सैन्यामध्ये भरती व्हावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे भागवत यांनी सांगितले.