Tue, Mar 26, 2019 07:38होमपेज › Konkan › धामापूर तर्फे संगमेश्‍वरला आढळला मृत बिबट्या

धामापूर तर्फे संगमेश्‍वरला आढळला मृत बिबट्या

Published On: Jun 21 2018 10:56PM | Last Updated: Jun 21 2018 10:52PMदेवरूख : वार्ताहर

संगमेश्‍वर तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्‍वर येथे गुरुवारी सकाळी 7.30 वा.च्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जात आहे.  त्यामुळे जंगली प्राण्यांचा अधिवास मानवाकडून नष्ट केला जात आहे. यामुळे बिबट्या मनुष्य वस्तीत येण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

काही महिन्यांपूर्वी तांबेडी येथे घरात घुसून बिबट्याने एकावर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. तर बिबट्याचा मनुष्य वस्तीतील वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.  धामापूर तर्फे संगमेश्‍वर येथील ‘कोटाकुंभा’ या ठिकाणी एका झाडाखाली  सकाळी 7.30 वा.च्या सुमारास बिबट्या निपचित पडलेल्या अवस्थेत एका ग्रामस्थाला दिसून आला. बिबट्या दिसताच घाबरलेल्या या ग्रामस्थाने ही बाब ग्रामस्थांना सांगितली. 

ग्रामस्थांनी लागलीच याची माहिती कुंभारखणी खुर्द गावचे पोलिसपाटील चंद्रकांत महाडिक यांना कळविली. यानुसार त्यांनी याबाबतची माहिती देवरूख वन विभागाला दिली. यानंतर रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रियांका लगड, पालीचे वनपाल सुधाकर गुरव, देवरूखचे वनरक्षक सागर गोसावी व उपरे यांनी घटनास्थळी आले. बिबट्याची पाहणी केल्यानंतर हा बिबट्या मृत असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. हा बिबट्या सुमारे 7 वर्षांचा असून पूर्ण वाढीचा असल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. 

या मृत बिबट्याचा वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी पंचनामा केल्यानंतर या बिबट्याला आंबेड येथे आणून त्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलिंद नागले यांनी शवविच्छेदन केले. यामध्ये या बिबट्याचा भूकबळीने मृत्यू झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यानंतर या बिबट्यावर नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.