Fri, Apr 26, 2019 15:30होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : आंगणेवाडी श्री भराडी यात्रोत्सव २७ जानेवारी रोजी

सिंधुदुर्ग : आंगणेवाडी यात्रोत्सव २७ जानेवारी रोजी

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 02 2017 8:45PM

बुकमार्क करा

मसुरे : वार्ताहर

भक्‍तांच्या हाकेला-नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्‍तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी आईची यात्रा शनिवारी 27  जानेवारी  2018  रोजी निश्‍चित करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी यात्रेची तारीख निश्‍चित करण्यासाठी  पारंपरिक ‘पारध’ कार्यक्रम झाला. त्यानंतर देवीला कौल प्रसाद लावून देवीने दिलेल्या निर्देशानुसार यात्रोत्सावाची तारीख जाहीर करण्यात आली.

नवसाला पावणारी आणि लाखो भक्‍तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या आंगणेवाडीतील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाची तारीख निश्‍चितीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. गावातील मुंबईस्थित चाकरमानी तर यात्रेच्या तारखेकडे डोळे लावून असतात. डिसेंबर महिना आला की मुंबईस्थित चाकरमानी, मित्रमंडळी आपापल्या नातेवाईकांना सतत संपर्क ठेवून असतात. एकदा तारीख निश्‍चित झाली की यात्रेत येण्यासाठी तिकीट बुकिंगसाठी गर्दी, सुट्टीकरिता धडपड करत असतात.  शुक्रवारी सकाळी मंडळाच्या वतीने यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 

दरवर्षी गर्दीचे नवनवे उच्चांक गाठणार्‍या या यात्रोत्सवात यावर्षीही 10 ते 15 लाखांहून अधिक भाविक  यात्रोत्सवास हजेरी लावतील, असा अंदाज  आहे. आंगणेवाडी मंडळ तसेच जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनाकडून यात्रा नियोजनास लवकरच सुरुवात होणार आहे.