Wed, Apr 24, 2019 19:43होमपेज › Konkan › देवगड तालुक्यातील पर्यटनस्थळे विकासापासून दूरच!

देवगड तालुक्यातील पर्यटनस्थळे विकासापासून दूरच!

Published On: May 27 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 10:11PMसचिन लळीत

सागरी महामार्ग सुरू झाला आणि कोकणातील अनेक सुंदर असे बीच पर्यटनदृष्या विकसित होवू लागले.गणपतीपुळे ते मालवणपर्यंत अनेक सुंदर पर्यटन क्षेत्रांकडे पर्यटकांचा ओढा वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.गेल्या काही वर्षात देशाच्या पर्यटन नकाशावर सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटकांच्या पसंतीचा ठरला.परंतु कोकणातील हे पर्यटन विकसित होताना केवळ मालवण, तारकर्ली,देवबाग या भागाचा पर्यटनदृष्या जेवढा विकास झाला तेवढा विकास देवगड तालुक्यातील पर्यटन स्थळांचा झालेला दिसत नाही.देवगड तालुक्यात अनेक ठिकाणी  पर्यटकांना खुणावणारे असे नयनरम्य समुद्र किनारे तसेच धार्मिक स्थळेही आहेत. ऐतिहासिक महत्व असणार्‍या या पर्यटनस्थळांचा  योग्यप्रकारे विकास झाल्यास पर्यटनाला मोठा वाव मिळेल.

जगाच्या नकाशावर मोठ्या प्रमाण सध्या चर्चेत असणारे विजयदुर्ग बंदर हे पर्यटनदृष्या विकसित झाल्यास या भागातील पर्यटन वाढीला चालना मिळेल. विजयदुर्ग भागात येणारी गिर्ये पवनचक्‍की, विजयदुर्ग किल्ला, रामेश्‍वर मंदिर,संभाजी आंग्रे यांचे समाधीस्थळ, दामले बीच, ऐतिहासिक असलेले गोदी,पुरळ रेडेबांध येथील विस्तीर्ण किनारा, हुर्शी येथील गणपती मंदिर,पुरळ कळमई येथील समुद्रकिनारा व तेथील सुरूचे बन, मणचे येथील व्याघे्रश्‍वर धबधबा, वाडा येथील पांडवकालीन असलेले विमलेश्‍वर मंदिर व वाडातर येथील खाडी किनारी असणारे श्री हनुमान मंदिर या पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास पर्यटनाला मोठा वाव मिळेल.विजयदुर्ग येथील रामेश्‍वर मंदिर हे पाहण्यासारखे असून या मंदिराचा म्हणावा तेवढा पर्यटनदृष्याविकास झालेला नाही.

अतिशय सुंदर व शांत व पावित्र्य राखण्यात आलेले हे मंदिर पर्यटकांना पाहताच क्षणी भुरळ घालते. याठिकाणी सुंदर असा अध्यात्मिक आनंद पर्यटकांना अनुभवता येतो.विजयदुर्ग येथील समुद्र किनारे अतिशय सुंदर व सुरक्षित आहेत. याठिकाणी स्कुबा डायव्हिंग सुरू झाल्यास येथील पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल.देवगडमधील तांबळडेग समुद्र किनारा तसेच या समुद्र किनारी उंचावर असलेले गजबाईचे मंदिर हे पर्यटकांना आकर्षित करणारे स्थळ आहे. त्याच बरोबर तांबळडेग मोर्वे खाडी, दाभोळे पोखरबाव येथील निसर्गरम्य व भाविकांचे श्रध्दास्थान असलेले सिध्दीविनायक गणपती हे धार्मिक स्थळ, कुणकेश्‍वर, कातवण, देवगड पवनचक्‍की पॉईंट, देवगड किल्ला, देवगडचा समुद्रकिनारा, देवगड बंदर, तारामुंबरी समुद्र किनारा तसेच येथील बीच पर्यटकांना मोहून टाकणारे आहेत.

पर्यटनामुळे ज्याप्रमाणे मालवण तालुका विकसित झाला आहे त्याप्रमाणे देवगड तालुक्यातील पर्यटन विकासाला गती देणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून या पर्यटनस्थळांच्या विकासाला शासनस्तरावरून गती आणणे महत्त्वाचे आहे.