Thu, Jun 27, 2019 13:58होमपेज › Konkan › देवगड तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी फईम शेख यांचा प्रयत्न

देवगड तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी फईम शेख यांचा प्रयत्न

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 9:11PM

बुकमार्क करा
 देवगड : प्रतिनिधी

कोकणातही घोडेसवारीसह पंचतारांकित पर्यटन होवू शकते याचे  रोलमॉडेल साईमा  हेरीटेजचे मालक व उद्योजक फईम शेख यांनी नुकतेच मिठमुंबरीच्या समुद्रकिनार्‍यावर दाखवून दिले. त्यांनी मोफत ऑफरोड व्हेईकल, कयाक बोटी मिठमुंबरी समुद्रकिनार्‍यावर आणून जामसंडे येथील शालेय विद्यार्थ्यांना पर्यटनाचा भरभरून आनंद लुटू दिला. अशाप्रकारचे पर्यटन देवगड तालुक्यातही विकसित झाल्यास रत्नागिरीहून देवगडमार्ग मालवणला जाणारा पर्यटक येथेच थांबू शकेल हे येथील भूमिपुत्रांना दाखवून दिले.

फईम शेख हे कोटकामते गावचे रहिवाशी असून त्यांनी मस्कत येथे आपला  बांधकाम व्यवसाय उभारला. मात्र ते आपल्या गावाला विसरले नाहीत. शेख यांनी वॅक्स म्युझियमची देखणी इमारत  देवगडमध्ये बांधली आहे. गावासाठी धडपडणारा हा तरूण देवगडमधील पर्यटन वृद्धिंगत व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहे. म्हणूनच मिठमुंबरी येथे घोडेसवारी, कयाकींग बोटीद्वारे तारामुंबरी खाडीत बोटिंग, ऑफरोड व्हेईकलद्वारे वाळूवर सफर, तंबूनिवास संकल्पना ही त्यांनी एक  दिवसासाठी का होईना जामसंडे येथील मुकूंद फाटक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उभी केली.

शुक्रवार 29 रोजी मिठमुंबरी येथे बीचमहोत्सव होत आहे, यानिमित्ताने पर्यटनासाठी केलेले हे प्रयत्न नागरिकांनाही दिशादर्शक ठरणार आहेत. मालवणवासीयांनी प्रत्येक बीच पर्यटनासाठी तयार केला. मात्र, देवगडवासीय यापासून दूर आहेत. यातून योग्य तो धडा घेवून जर प्रत्येक समुद्रकिनार्‍यावर पर्यटन सुरू झाले तर नक्कीच देवगड तालुका पर्यटनदृष्टया लांब राहणार नाही, असे मत व्यक्त होत आहे. पर्यटनाचे हे उभारलेले मॉडेल पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.