Sun, Jul 21, 2019 17:06
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › ‘ओखी’चा तांबळडेग किनार्‍याला फटका

‘ओखी’चा तांबळडेग किनार्‍याला फटका

Published On: Dec 04 2017 1:37AM | Last Updated: Dec 03 2017 10:54PM

बुकमार्क करा

देवगड : प्रतिनिधी

ओखी चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीलाही बसला आहे. समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे मिठबांव तांबळडेग समुद्र किनारी काढून ठेवलेली भंडारी रापण संघाची नौका पाण्याच्या अचानक वाढलेल्या प्रवाहाने लाटांबरोबर समुद्राच्या पाण्यात वाहून गेली. त्याबरोबर  नौकेतील  रापणीचे जाळेही पाण्यात वाहून गेले. सुदैवाने नौका पकडण्यात मच्छीमारांना यश आले. जाळी वाहून गेल्याने रापण संघाचे सुमारे साडेसहा लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी रात्री 11 वा.च्या सुमारास घडली.केरळ आणि तामिळनाडूच्या किनार्‍यावर धडक दिलेल्या ओखी चक्रीवादळाने किनारपट्टी भागात हाहाकार माजविला असून या चक्रीवादळाचा धोका सिंधुदुर्ग किनारपट्टीलाही बसण्याचा इशारा देण्यात आला होता. ओखी चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसू लागला असून पाण्याची पातळी वाढल्यामुळे मिठबांव तांबळडेग समुद्र किनारी स्मशानभूमीजवळ भरतीच्या उच्चतम रेषेच्या खूप वर किनार्‍यावर काढून ठेवलेली तेथील भंडारी रापण संघाची नौका शनिवारी रात्री 11 वा.च्या सुमारास किनार्‍यावर आलेल्या पाण्याचा प्रवाहाबरोबर  व लाटांच्या तडाख्याने पाण्यात वाहून जात होती. यावेळी  आपल्या नौकांकडे आलेल्या तांबळडेग येथील माजी सभापती डॉ. मनोज सारंग, प्रदीप कोयंडे, पंढरीनाथ सनये, नारायण येरम, सागर सनये आदी ग्रामस्थांना रापणी संघाची नौका व जाळे वाहून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ रापण संघाशी संपर्क साधला.त्यानंतर रापण संघाच्या सदस्यांनी तांबळडेग ग्रामस्थांच्या सहकार्याने वाहून जात असलेल्या नौकेला पकडले तर रापणीच्या जाळ्याच्या दोरीचे एक टोक हाती लागल्यामुळे ते किनार्‍यालगत असलेल्या माडाच्या झाडाला बांधून ठेवण्यात आले. मात्र रापणीचे पूर्ण जाळे खडकात वाहून गेले.

रविवारी सकाळी रापण संघाच्या सर्व सदस्यांनी गजबादेवी मंदिर येथे पायथ्याशी असलेल्या खडकात अडकलेले जाळे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला. या घटनेची माहिती समजताच मिठबांव सरपंच जयकुमार नारिंग्रेकर, तांबळडेग माजी उपसरपंच काका मुणगेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.दोघांनीही घडलेल्या घटनेबाबत तहसीलदार, मत्स्यव्यवसाय विभाग, बंदर विभागांना कळविण्यात आले मात्र संबंधित विभागाचा एकही अधिकारी रविवारी दुपारपर्यंत दाखल झाला नाही.

मिठबांव येथील भंडारी रापण संघ हा मिठबांव तांबळडेगमधील सर्वांत मोठा रापण संघ असून शासनाने व प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन रापण संघाच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा व त्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मिठबांव सरपंच जयकुमार नारींग्रेकर यांनी केली आहे.