Fri, Jul 19, 2019 05:37होमपेज › Konkan › कुणकेश्‍वर यात्रेची जय्यत तयारी

कुणकेश्‍वर यात्रेची जय्यत तयारी

Published On: Feb 02 2018 10:47PM | Last Updated: Feb 02 2018 10:24PMदेवगड : प्रतिनिधी

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री देव कुणकेश्‍वर  महाशिवरात्री यात्रोत्सव  13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे.   देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने  यात्रा नियोजनाच्या दृष्टीने युद्धपातळीवर जय्यत तयारी सुरू झाली आहे. यात्रेमध्ये प्लास्टिक पिशवी विक्री व वापर करण्यास बंदी करण्यात आली आहे. कुणकेश्‍वर भेटीसाठी येणार्‍या देवस्वार्‍यांनी देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणारा कुणकेश्‍वर यात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दृष्टीने येथील मंदिर परिसर, सुशोभिकरण, रंगरंगोटी, भव्य मंडप व्यवस्था, विद्युत व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीमध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी बॅरीकेटींग व मजबूत रेलिंग अशी कामे युध्दपातळीवर सुरू आहेत.

यात्रेच्यावेळी गर्दीचा  फायदा घेवून चोर्‍या करणे,महिलांची छेडछाड करणे, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी देवस्थान  ट्रस्टकडून मंदिर व मंदिर परिसर व आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.कुणकेश्‍वर बीचवरही सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.

श्री क्षेत्र कुणकेश्‍वर ठिकाणी येणार्‍या सर्व रस्त्यांची रुंदीकरण व डांबरीकरणाची कामे त्वरित सुरू करावीत, अशी मागणी देवस्थान ट्रस्टने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. त्यांनी ही कामे तत्काळ करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

श्री क्षेत्र कुणकेश्‍वर यात्रेसाठी येणार्‍या भाविकांची गर्दीच्या प्रमाणात  दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. यावर्षी माघ अमावास्येदिवशी तीर्थस्नानासाठी येणारे भाविक व देवभेटीकरिता येणार्‍या देवस्वार्‍या यामुळे गर्दीचा उच्चांक होणार आहे.

 सुरक्षिततेच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ कुणकेश्‍वर तसेच शासकीय यंत्रणा यांच्याकडून काटेकोरपणे नियोजन होत आहे. समुद्र किनारील भागामध्ये सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था तसेच पुरूष व महिलांकरिता ठिकठिकाणी कपडे बदलण्यासाठीची व्यवस्था असणार आहे. त्याचप्रमाणे पोलिस यंत्रणा व कुणकेश्‍वर ग्रामस्थांकडून भाविकांसाठी समुद ्रकिनारी सुरक्षा पथके असणार आहेत. यात्रा परिसरामध्ये राजकीय बॅनर्स व इतर बॅनर्स यांपासून असुरक्षितता निर्माण होवू नये यासाठीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कुणकेश्‍वर यांच्याकडून करण्यात आले आहे.

यात्रेमध्ये प्लास्टिक बंदी

यात्रेमध्ये व्यापारी, पुजा साहित्य विक्रेते, फुल विक्रेते यांना प्लास्टिक पिशवी वापर व विक्रीवर बंदी करण्यात आली आहे.यादृष्टीने व्यापारी व ग्राहकांनी देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था

दरवर्षी कुणकेश्‍वर तळेवाडी व कुणकेश्‍वर पर्यटन संकूल या ठिकाणी पार्किग व्यवस्था करण्यात येत होती. यावर्षी तारामुंबरी मिठमुंबरी पुल वाहतुकीस खुला झाल्यामुळे देवगडहून येणार्‍या गाड्यांसाठी मंदिरापासून काही अंतरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.यामुळे यावर्षीची यात्रा कुणकेश्‍वर मंदिराकडून तारामुंबरी मिठमुंबरी पुल जाणार्‍या रस्त्याकडेही भरण्याची शक्यता आहे.