होमपेज › Konkan › खेड-मंडणगड मार्गावरील ‘खोदाई’ थांबवली

खेड-मंडणगड मार्गावरील ‘खोदाई’ थांबवली

Published On: Feb 10 2018 11:17PM | Last Updated: Feb 10 2018 11:01PMखेड : प्रतिनिधी

खेड शहरासह खेड-दापोली व खेड-मंडणगड रस्त्याच्या बाजूला मोठ्या भ्रमणध्वनी कंपनीच्या नावाने काही ठेकेदार अनिर्बंध खोदाई करत असल्याची बाब समोर आली आहे. खेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र देशमुख यांनी शुक्रवारी खेड-मंडणगड मार्गावर धामणी घाटात रस्त्याच्या बाजूला खोदून टाकलेले केबलचे पाईप काढून टाकण्याच्या सूचना संबंधितांना देतानाच काम थांबवण्यास सांगितले आहे.

शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या बाजूला एका मोठ्या भ्रमणध्वनी कंपनीचे नाव सांगत काही ठेकेदारांनी गेल्या काही महिन्यांपासून नगरपालिका, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, रस्त्याच्या बाजूपट्ट्या, मोर्‍या, पूल यांची राजरोसपणे नासधूस सुरू केली आहे. या प्रकारांकडे लक्ष वेधण्यासाठी माध्यमांनी सतत पाठपुरावा केला. परंतु, तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, शासकीय अधिकारी यांनी या प्रकारांकडे सातत्याने दुर्लक्ष करत संबंधित ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे सत्र सुरूच ठेवले होते. काही दिवसांपूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.

माध्यमांच्या प्रतिनिधींनी केलेली मागणीची दखल घेऊन काही दिवसांपूर्वी खेड-मंडणगड मार्गाच्या बाजूला रस्त्याच्या बाजूपट्टीवर खोदाई करणार्‍या  कामगारांकडून फावडे, टिकाव व घमेली जप्त करून आणली होती. ही कारवाई येथील बांधकाम विभागातील अभियंता पावसे यांनी देशमुख यांच्या सूचनेनुसार केली होती. त्यानंतर रस्त्याच्या बाजूपट्टीवर धोकादायकरित्या गाडण्यात आलेला केबलचा पाईप स्वतः देशमुख यांनी तोडून टाकत संबंधितांना तो काढून टाकण्याची ताकीद दिली होती. याच दरम्यान माध्यमांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे येथील उपविभागीय अधिकारी देशमुख यांच्यासोबत सायंकाळी 4 ते 7 या कालावधीत खेड-मंडणगड मार्गावरील  आयनी व धामणी घाटात सुरू असलेली खोदाई रोखण्यासाठी धडक दिली. यावेळी देशमुख यांनी संबंधित ठेकेदाराला खोदाईच्या ठिकाणी बोलवून घेत आयनी येथे रस्त्यालगत सुरू असलेली खोदाई थांबवत धामणी घाटात बाजूपट्टीवरच गाडण्यात आलेली केबल काढून टाकण्याच्या सूचना केल्या.