होमपेज › Konkan › मार्लेश्‍वर तीर्थक्षेत्राला वार्षिक यात्रोत्सवाचे वेध!

मार्लेश्‍वर तीर्थक्षेत्राला वार्षिक यात्रोत्सवाचे वेध!

Published On: Dec 13 2017 1:56AM | Last Updated: Dec 12 2017 10:44PM

बुकमार्क करा

देवरूख : नीलेश जाधव

संपूर्ण राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू श्री देव मार्लेश्‍वर तीर्थक्षेत्राला वार्षिक यात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. मकर संक्रांतीला होणार्‍या या वार्षिक यात्रोत्सवाकडे मार्लेश्‍वरावर श्रद्धा असणार्‍या भाविकांचे आतापासूनच लक्ष लागून राहिले आहे. या वर्षी हा वार्षिक यात्रोत्सव दि. 11 ते 17  जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे, तर मार्लेश्‍वराचा विवाह सोहळा (कल्याणविधी) दि. 14  रोजी होणार आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील देवरूख शहरापासून सुमारे 18 कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वताच्या कडेकपारीत व निसर्गरम्य ठिकाणी एका गुहेमध्ये स्वयंभू मार्लेश्‍वराचे देवस्थान वसले आहे. तेथील गुहेमध्ये सापांचा वावर असतो. मात्र, आजपर्यंत एकाही भाविकाला सापांकडून इजा झाल्याचे ऐकिवात नाही.

मार्लेश्‍वराचे देवस्थान स्वयंभू व निसर्गरम्य ठिकाणी वसले असल्याने राज्याच्या कानाकोपर्‍यांतून दररोज हजारो भाविक मार्लेश्‍वराच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्री येत असतात. तसेच हे शासनाने तीर्थक्षेत्र राज्य शासनाने  ‘क’ दर्जाचे घोषित केले असल्यामुळे येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठीही हजारो पर्यटक या ठिकाणी दाखल होऊ लागले आहेत. देवस्थानसमोरच बारमाही वाहणारा धारेश्‍वर धबधबा असून तो पर्यटक, भाविकांसाठी आकर्षणचा केंद्रबिंदू ठरला  आहे. 

स्वयंभू मार्लेश्‍वराचे देवस्थान हे साधारणपणे 18 व्या शतकातील असून, या देवस्थानचे मूळ शंकराचे शिवलिंग देवरूख शहरापासून केवळ 3 कि.मी. अंतरावरील मुरादपूर गावी होते. परंतु, तेथील अत्याचाराला कंटाळून शिवलिंगरूपी सत्पुरुषाने जिथे मनुष्य वस्ती नाही व जिथे कोणताही भ्रष्टाचार नाही, अशा शांत ठिकाणी जायचे ठरवले व तेथून श्री देव मार्लेश्‍वर हे  आंगवली मठात आले. त्यानंतर ते सह्याद्रीच्या एका गुहेत जाऊन राहिले, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. मार्लेश्‍वरचा वार्षिक यात्रोत्सव या वर्षी दि. 11 ते 17 जानेवारी या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.