Wed, Jul 17, 2019 12:00होमपेज › Konkan › देवरूखच्या हॉकीपटूंची मलेशियात धूम

देवरूखच्या हॉकीपटूंची मलेशियात धूम

Published On: Jan 03 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 8:11PM

बुकमार्क करा
देवरूख : प्रतिनिधी

देवरूख येथील हॉकीपटू चंद्रवदन मांडवकर, वैभव बोथले व अनिकेत धामणे या खेळाडूंनी ‘आंतरराष्ट्रीय आशियाई पेस्टा हॉकी सिक्स ए साईड’ या स्पर्धेत चांगला खेळ करून मलेशिया येथील रसिकांची मने जिंकली. मलेशिया येथे झालेल्या या 44 व्या आशियाई स्पर्धेसाठीच्या  भारतीय संघात देवरूखमधील तीन खेळाडूंना स्थान मिळाले होते. ‘द हॉकी रत्नागिरी’ यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंची निवड झाली होती. यानुसार मलेशिया येथील युएसएम युनिव्हर्सिटी मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात संघाला मलेशिया विरूद्ध 3 -2 ने हार मानावी लागली.  यानंतर या संघाने इंडोनेशिया या संघावर 2-1 ने मात केली. तर ऑस्ट्रिया या संघावर देखील 3-1 असा विजय संपादन केला. 

या विजयामुळे संघ उपउपांत्य  फेरीत पोहचला. यावेळी चीनबरोबर झालेल्या सामन्यात संघाला हार पत्करावी लागली. मात्र, लाल मातीत खेळणार्‍या या देवरूखमधील तीनही खेळाडूंना मलेशिया येथील मैदानावर खेळ खेळण्याचा अनुभव मिळाला. यात तिघांची निवड ही कोलकता येथे झालेल्या राष्ट्रीय हॉकी शिबिरातून झाली होती. चंद्रवदन मांडवकर हा खेळाडू 2012 पासून हॉकी खेळत आहे.जिल्हास्तरीय स्पर्धेत मांडवकरच्या संघाने प्रथम क्रमांकाची बाजी मारली होती. दोन वर्षे विभागीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली. मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धेत सलग तीन वर्षे मांडवकरने चांगला खेळ  केला. 

पाच राज्यांसाठी होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेत देखील मांडवकर याने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले होते. ऑल इंडिया इनडोअर राष्ट्रीय स्पर्धेत चारवेळा मांडवकर याने खेळ केला. यानंतर कोलकता येथे झालेल्या शिबिरात त्याची निवड करण्यात आली होती. अनिकेत धामणे हा खेळाडू देखील इयत्ता पाचवीपासून ठाकरे विद्यालयातून हॉकी खेळ खेळत आहे. सलग 7 वर्षे जिल्हा स्पर्धा खेळला. ध्यानचंद कपसाठीदेखील अनिकेतने खेळ केला. मे. शांताराम जाधव स्पर्धेत उपविजेते पद प्राप्त केले. तसेच विभागीय स्पर्धेत उपविजयी पद मिळवले. यानंतर त्याची आंतरराष्ट्रीय  स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड झाली.  

वैभव बोथले हादेखील 2013 सालापासून खेळ खेळत असून हिमाचल प्रदेश येथील स्पर्धेत त्याने खेळ केला आहे. 19 वर्षांखालील औरंगाबाद येथे झालेल्या अजिंक्य स्पर्धेतही त्यांनी उत्कृष्ठ खेळ खेळून केला. अहमदनगर येथील राज्य अजिंक्यपद स्पर्धा, गडचिरोली येथील राज्य स्पर्धा,  भुसावळ येथील राज्य स्पर्धेत त्याचा सहभाग, तीन वर्षे ध्यानचंद कप या स्पर्धेत चांगली चमक दाखवली आहे. 
राष्ट्रीय इनडोअर हॉकी स्पर्धेत दोन वेळा खेळ केला आहे. यानंतर त्याची कोलकता शिबिराद्वारे आंतरराष्ट्रीय मलेशिया येथील स्पर्धेत खेळण्याची त्याला संधी मिळाली. चंद्रवदन मांडवकर, अनिकेत धामणे व वैाव बोथले यांनी मलेशिया येथे झालेल्या स्पर्धेत चांगला खेळ करून दाखवला.

या संघाचे प्रशिक्षक म्हणून अश्पाक शेख व व्यवस्थापक म्हणून नंदकिशोर खैरनार यांनी काम पाहिले. खेळाडूंच्या मलेशिया वारीतील यशाबद्दल द हॉकी रत्नागिरीचे अध्यक्ष डॉ. राजकुमार इंगळे, उपाध्यक्ष राजेंद्र कदम, सचिव निखिल कोळवणकर, खजिनदार बाबा दामुष्टे, सदस्य विनोद पोळ  यांच्यासह हॉकीप्रेमींकडून विशेष कौतुक होत आहे.