Wed, Mar 20, 2019 22:54होमपेज › Konkan › देवरूख शहरात खंडणी वसूल करणार्‍यावर गुन्हा

देवरूख शहरात खंडणी वसूल करणार्‍यावर गुन्हा

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 21 2018 10:28PMदेवरूख : वार्ताहर

मी देवरूख नगरपंचायतीचा अधिकारी आहे, असे भासवून युनियनमध्ये सहभागी व्हा, असे धमकावत देवरूख शहरातील फेरीवाले व खोकेधारकांकडून रत्नागिरी येथील एका तोतया अधिकार्‍याने बेकायदेशीर पैसे उकळले आहेत. याप्रकरणी नरेश विठोबा जाधव याच्यावर खंडणी उकळल्याप्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत देवरूख पोलिस ठाण्यात भाजी विक्रेती महिला अनुष्का चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. नरेश याने मी देवरूख न.पं. चा अधिकारी आहे, युनियनमध्ये सहभागी व्हा, असे सांगून काही फेरीवाले, खोकेधारकांकडून अनधिकृतपणे पैसे उकळले. घेतलेल्या पैशांची रितसर पावतीही दिली नाही. यातच सोमवारी फेरीवाले, भाजी विक्रेत्या महिला यांच्याकडून पैसे मागितले. यापुढे जाऊन तक्रार दाखल केली तर मी तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, असेदेखील धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

यावर आक्रमक भूमिका घेत भाजी विक्रेत्या महिला, फेरीवाले, व्यापारी, लोकप्रतिनिधी यांनी नरेश याला घेऊन थेट देवरूख पोलिस ठाणे गाठले. झालेला प्रकार देवरूख पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी अधिक चौकशी केली असता नरेश हा तोतया अधिकारी असल्याचे निरीक्षक पाटील यांनी सांगितले.