Tue, Jul 16, 2019 22:26होमपेज › Konkan › शिवसेनेने शाखा हटवली, ‘मनसे’चे काय?

शिवसेनेने शाखा हटवली, ‘मनसे’चे काय?

Published On: Apr 25 2018 10:41PM | Last Updated: Apr 25 2018 10:10PMदेवरूख : प्रतिनिधी

शहरातील शिवाजी चौक येथे जिल्हा परिषदेच्या जागेत अनधिकृतरित्या उभारलेले बांधकाम शिवसेनेने मंगळवारी रात्री काढून टाकले आहे. सेनेने बांधकाम काढल्यामुळे प्रशासनाकडून त्यांच्यावर होणारी कारवाई थांबली आहे. याच जागेत ‘मनसे’ची देखील शाखा अनधिकृत उभी आहे. ही शाखा ‘मनसे’ स्वत:हून काढते की प्रशासन कारवाई करते याकडे देवरूखवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. 

सेनेने स्वत:चे कार्यालय असावे, या उद्देशाने जि.प. च्या शिवाजी चौक येथील पडीक जागेत रातोरात बांधकाम करून सेनेची शाखा स्थापन करण्यात आली होती. यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी या बांधकामाला विरोध दर्शवला. यावेळी शिवसेनेने शाखा उभ्या असलेली जागेची मालकी सिद्ध करा, यानंतर हे बांधकाम काढू असे सांगितले होते. शिवसेनेने हे अनधिकृत बांधकाम उभे करताच शहरातील ‘मनसे’ने देखील पाठोपाठ अनधिकृतरित्या पत्र्याची शेड उभी करून शाखा स्थापन केली. यामुळे मोठा वादंग उभा राहिला. ‘मनसे’ने न. पं. प्रशासनाला शिवसेनेची शाखा पाडा त्यानंतर आमची शेड काढून घेऊ, असा इशारा दिला.

दरम्यान, ज्या जागेत अनधिकृत शाखा उभ्या राहिल्या याची मालकी निश्‍चित होत नव्हती. नगरपंचायत, बांधकाम विभाग वा जिल्हा परिषद या तीनपैकी जागेची मालकी कोणाची आहे हे स्पष्ट होत नव्हते. अखेर जि. प. ने त्यांच्या असलेल्या जागेची मोजणी केली असता, शिवसेना शाखा व ‘मनसे’ची शाखा ही जि. प. च्या जागेत असल्याचे स्पष्ट झाले. यानुसार दोन्हीही शाखांना आपले बांधकाम तोडून तसेच शेड उचलण्याचे आदेश जि. प. ने दिले होते. अन्यथा हे बांधकाम तोडण्यात येईल, असा इशारा दिला होता. 

शिवसेनेने या आदेशाचे पालन करून मंगळवारी रात्री स्वत:हून हे बांधकाम काढून टाकले आहे. ज्याप्रमाणे रात्रीचे बांधकाम उभे केले, याचप्रमाणे हे बांधकाम रात्रीचेच शिवसेनेने काढले आहे. ‘मनसे’ची शाखामात्र अजूनही  सुरू असून या शेडवर ‘मनसे’ ने आपला झेंडा व फलक देखील लावला आहे. याच ‘मनसे’ ने सेनेची शाखा पाडा नंतर आम्ही बांधकाम काढू अशी स्पष्टोक्ती दिली होती. याची पूर्तता मनसे करते का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपने निर्विवाद ‘मनसे’ला सोबत घेऊन न. पं. वर कब्जा मिळवला आहे. हीच ‘मनसे’ शाखेची अनधिकृत शेड काढते का? असा प्रश्‍न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.