होमपेज › Konkan › गरज असते फक्त प्रबळ इच्छाशक्तीची

गरज असते फक्त प्रबळ इच्छाशक्तीची

Published On: Jan 03 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 8:24PM

बुकमार्क करा
देवरूख : वार्ताहर

आरोग्य यंत्रणेबद्दल नेहमी ओरड केली जाते. मात्र, याला संगमेश्‍वर तालुक्यातील कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र अपवाद ठरले आहे. रुग्णांना सेवा देण्यात हे आरोग्य केंद्र तत्पर ठरत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष यादव व त्यांच्या सहकार्‍यांच्या तत्पर सेवेमुळे या आरोग्य केंद्रात बाह्यरुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी या केंद्रासाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. यादव यांनी नवनव्या संकल्पना मांडत या केंद्रासाठी अत्याधुनिक यंत्रे रुग्णांच्या सेवेकरिता केंद्रात उपलब्ध करून दिली आहेत.       

या केंद्रातील रुग्णांना शस्त्रक्रियागृह उपलब्ध नव्हते. मात्र, डॉ. यादव यांनी पुढाकार घेत या केंद्रात नव्यानेच शस्त्रक्रियागृह सुरु केले आहे. आतापर्यंत तब्बल 56 शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. या शस्त्रक्रियांसाठी पूर्वी संगमेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात जावे लागत होते. मात्र कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियागृह सुरू करण्यात आल्याने परिसरातील रुग्णांचा वेळ व पैसा वाचत आहे. या आरोग्य केंद्रात सध्या 1 वैद्यकीय अधिकारी, 1 परिचारिका, 1 फार्मासिस्ट, 3 सुपरवायझर व वर्ग 4 चे 4 शिपाई असे कर्मचारी आहेत. कर्मचारी जबाबदारी सक्षमपणे पेलतात. आरोग्य केंद्राच्या टाकावू वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी जि.प. ने 2.5 लाखांचा खर्च करून आरोग्य केंद्राच्या आवारात खड्डे मारून बायोवेस्ट प्रकल्प राबविला आहे. या केंद्राच्या सुशोभिकरण कामासाठी जि.प. उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी पुढाकार घेतला आहे.