होमपेज › Konkan › ७७  वर्षीय शेतकर्‍याचा तरुणांना लाजवेल असा प्रयोग!

७७  वर्षीय शेतकर्‍याचा तरुणांना लाजवेल असा प्रयोग!

Published On: Jul 28 2018 11:01PM | Last Updated: Jul 28 2018 10:51PMदेवरूख : वार्ताहर

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आवड, जिद्द व मेहनत घेण्याची मनापासून तयारी असेल तर ती गोष्ट पूर्णत्वास नेण्यास काहीच अडचण येत नाही. हे संगमेश्‍वर तालुक्यातील कोसुंब येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रयोगशील शेतकरी यशवंत ऊर्फ जेपीभाऊ जाधव यांनी दाखवून दिले आहे. वयाच्या 77 व्या वर्षीही तरूणांना लाजवेल, असे काम करून मोठ्या कष्टाने तब्बल एक एकर जागेत त्यांनी हळद लागवड केली आहे. त्यांचा हा आदर्श तरूणांनी घेण्यासारखा असाच आहे.

भातशेतीतून मिळणारे मर्यादित उत्पन्न, अधिक मनुष्यबळ व जमिनीचा रासायनिक खतामुळे बिघडत चाललेला पोत लक्षात घेता काहीतरी वेगळे करून दाखवण्याची 77 व्या वर्षीदेखील उमेद असलेल्या यशवंतभाऊंच्या मनात नवनवीन प्रयोग करण्याची कल्पना सुचते. अशातूनच त्यांनी यापूर्वी बटाचा, तिळाची शेती, सूर्यफुलाची शेती असे विविध नावीन्यपूर्ण प्रयोग आपल्या जागेत केले आहेत. त्यांचे हे प्रयोग यशस्वीही झाले आहेत.

यशवंतभाऊंना कृषी विषयाची विशेष आवड आहे. भातशेतीसाठी भाजावळ, नांगरणी, भातपेरणी, उखळट, बेरणी, लावणी, भातकापणी व भातझोडणी या संपूर्ण प्रक्रियेचा विचार करता यासाठी मनुष्यबळ व पैसा खर्च होतो. त्यामुळे भातशेतीऐवजी दुसरा काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचे यशवंतभाऊंनी ठरवले. त्यांनी या वर्षी तब्बल एक एकर जागेत हळद लागवड करण्याचे निश्‍चित केले. यानुसार 125 किलो पेक्षा अधिक ‘सेलम’ या उच्चप्रतीचे व सुधारित जातीचे हळदीचे बियाणे बाजारातून खरेदी केले.

यानंतर त्यांनी पॉवर टिलरच्या द्वारे हळद लागवड करण्याच्या जागेची नांगरणी केली. नांगरणी झाल्यावर सरी वाफे तयार करून या वाफ्यांवर त्यांनी हळदीच्या बियाण्यांची व्यवस्थितपणे लागवड केली. यासाठी त्यांनी शेणखत व गांडुळखताचा उपयोग केला. आता ही हळदीची रोपे जमिनीच्या वर हळुहळू वर येत असून हिरवीगार दिसणारी ही रोपे यशवंतभाऊंच्या मनाला वेगळा आनंद देत आहेत. 
  यावर्षी त्यांनी तब्बल एक एकर जागेत हळद लागवड केली आहे. त्यातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा त्यांना आहे. वयाचे भान विसरून यशवंतभाऊंची नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी सुरू असलेली प्रामाणिक धडपड व 77 व्या वर्षीदेखील काहीतरी वेगळे करण्याची असलेली ओढ ही नक्कीच तरूणांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. स्वत:च्या कष्टाने केलेल्या हळद लागवडीचा प्रयोगही आता यशस्वी होईल, असा विश्‍वास यशवंतभाऊंनी व्यक्त केला आहे.