होमपेज › Konkan › देवरूख मच्छी मार्केट शेडची दुरवस्था

देवरूख मच्छी मार्केट शेडची दुरवस्था

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

देवरूख : प्रतिनिधी

शहरातील मच्छी-मटण मार्केटची इमारत धोकादायक झाली आहे. इमारतीच्या पुढे उभारण्यात आलेली लोखंडी शेड गंजली असून कोणत्याही क्षणी खाली कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याच्या डागडुजीकडे नगरपंचायतीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

काही वर्षांपूर्वी चिकन व मटण सेंटर ही देवरूख बाजारपेठेत विखुरलेल्या अवस्थेत होती. घाणीच्या साम्राज्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत होती. बाजारपेठेतून पादचार्‍यांना ये-जा करताना नाकावर रूमाल धरावा लागत होता. याचबरोबर शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत होती. याची दखल तत्कालीन सरपंचांनी घेऊन मच्छी- मटण मार्केट एका छताखाली यावे, यासाठी पुढाकार घेतला. कागदपत्रांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्याने लाखो रूपयांचा निधीदेखील उपलब्ध झाला. यानुसार सन 2008 साली मच्छी- मटण मार्केटचे बांधकाम पूर्णत्वास गेले.

याठिकाणी 25 चिकन सेंटर गाळे, 4 मटण गाळे तसेच मच्छी विक्रेत्यांसाठी मूलभूत सुविधेंतर्गंत गाळे उभारण्यात आले आहेत. तेव्हापासून या गाळेधारकांच्या समस्या ‘जैसे थे’ आहेत. ट्रॉलीमधील घाण न. पं.कडून त्वरित उचलली जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गाळ्यासमोर लोखंडी शेड उभारण्यात आली आहे. ही शेड सध्या गंजल्याने धोक्याची घंटा वाजवत आहे. शेड उभारण्यासाठी वापरण्यात आलेले लोखंडी सामान कमी दर्जाचे असल्याचे बोल परिसरातून उमटत आहेत.

लोखंडी पाईप गंजल्याने ही शेड कोणत्याही क्षणी खाली कोसळेल, अशी स्थिती झाली आहे. शेडसाठी आवश्यक असलेल्या लोखंडी खांब गंजल्याने ठोंब्याचा आधार देण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. गाळेधारकांकडून महिन्याला भाडे घेतले जाते. महिन्याच्या 5 तारखेपर्यंत भाडे न भरल्यास प्रतिदिनी दंड लावून वसूलदेखील केला जातो. मात्र, तेवढ्याच तत्परतेने शेडच्या डागडुजीच्या कामाकडे न. पं. कडून लक्ष दिले जात नसल्याचे खडेबोल उमटत आहेत.