Wed, Mar 20, 2019 03:14होमपेज › Konkan › नागरिकांच्या जीविताशी प्रशासनाचा खेळ

नागरिकांच्या जीविताशी प्रशासनाचा खेळ

Published On: Dec 08 2017 1:39AM | Last Updated: Dec 07 2017 10:27PM

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील चव्हाणवाडी, भटाळी परिसरात तालीमखाना येथील चौगुले कॉम्प्लेक्सच्या सांडपाण्याचा निचरा होत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रार करूनही याबाबत दुर्लक्ष होत असल्याने प्रशासन लोकांच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोप विरोधी गटनेते विनय गुरव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. 

या सांडपाण्याच्या निचर्‍यासंबंधी प्रशासनाकडून येत्या काही दिवसांत योग्य त्या उपाययोजना न केल्यास नगरपालिकेच्या आवारामध्ये सांडपाणी आणून ओतणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. गेल्या काही सभांमध्ये विरोधी गटाने प्रशासनाला चांगलेच ‘टार्गेट’ करताना प्रशासनाकडून लोकांच्या समस्यांचे निवारण होत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. प्रशासकीय कारभारावरून त्यांनी सत्ताधार्‍यांनाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना नगराध्यक्षांसह सत्ताधारी प्रशासनाला पाठीशी घालीत असल्याच्या शब्दामध्ये त्यांच्याकडून आक्षेप घेतला जात आहे.

चौगुले कॉम्प्लेक्सच्या बांधकामाच्या सांडपाण्याचा योग्य प्रकारे निचरा करण्याची व्यवस्था झालेली नाही. त्याचे नाहक त्रास लोकांना सहन करावे लागत आहे. तरीसुद्धा संबंधितांना बांधकाम पूर्णत्वाचा परवाना कसा देण्यात आला, असा प्रश्‍न विरोधी गटनेते गुरव यांनी उपस्थित केला. त्या कॉम्प्लेक्सच्या सांडपाण्याची योग्य ती व्यवस्था न झाल्यास सांडपाणी नगरपालिका आवारामध्ये ओतण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

शहराला भविष्यामध्ये भेडसावणार्‍या पाण्याची समस्या पाहता वैशिष्ट्यपूर्ण निधीतून प्रस्तावित असलेल्या कोंढेतड, प्रियदर्शनी वसाहत आदींच्या येथील पाण्याच्या टाक्यांची कामे होणे गरजेचे आहे. मात्र, ती कामे न करता प्रशासनाकडून वेगळीच कामे करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. हे खपवून घेतले जाणार नसून त्याविरोधात आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

स्वच्छता अभियान राबविण्याचा गवगवा करणार्‍या प्रशासनाचे मीनाताई ठाकरे व्यापारी संकुलाच्या स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष होत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. विरोधी गटाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नगरपालिका प्रशासन आणि विरोधी गट आमनेसामने आले आहेत. या पत्रकार परिषदेला शिवसेनेच्या नगरसेविका शुभांगी सोलगावकर, प्रतीक्षा खडपे, पूजा मयेकर, सौ. मराठे, सौ. आडविलकर, अनिल कुडाळी, भाजपचे नगरसेवक गोविंद चव्हाण आदी उपस्थित होते.