Sun, Jul 21, 2019 07:57होमपेज › Konkan › चिपी विमानतळ क्षेत्रातून जाणारे रस्ते पूर्ववत सुरू करा

चिपी विमानतळ क्षेत्रातून जाणारे रस्ते पूर्ववत सुरू करा

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 07 2018 10:53PM

बुकमार्क करा

वेंगुर्ले : शहर वार्ताहर 

चिपी विमानतळाच्या संपादित जमिनीतून गेलेला सागरी महामार्ग व इतर रस्ते सुस्थितीत करून वाहतुकीसाठी खुले करण्यात यावेत, असे आवाहन परुळे पंचक्रोशी ग्रामस्थांनी केले आहे. परुळे पंचक्रोशी ग्रामस्थांनी या संदर्भात खा. विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, जि. प. सदस्य सुनील म्हापणकर, जिल्हा अधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकरी अधिकारी, उपविभागीय अधिकारी सावंतवाडी महसूल, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी, तहसीलदार वेंगुर्ले, उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग वेंगुर्ले, उपविभागीय अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ कुडाळ या सर्वाना लेखी निवेदने दिली आहेत.

या निवेदनात म्हटले आहे, चिपी विमानतळाकरिता संपादित जमिनीतून कित्येक वर्षापासून रेवस- रेडी हा सागरी महामार्ग व त्या रस्त्याला जोडून  परुळे -चिपी -भरणी -कवठी ,परुळे -कोरजाई ,परुळे -कर्ली,परुळे -माकडाम  हे रस्ते गेले होते. विमानतळाचे काम सुरू करण्याअगोदर या रस्त्यांना पर्यायी रस्ते तयार करणे आवश्यक होते. मात्र तसे न करता गेल्या पाच वषार्ंपासून चिपी विमानतळाचे काम सुरू आहे. त्यामुळे वरील रस्त्यावरुन होणारी वाहतूक वारंवार अनियमित किंवा बंद पडते. परिणामी चिपी, भरणी, कवठी,कालवंड, कर्ली,मकडाम वाडयामधील ग्रामस्थांचा अन्य भागाशी संपर्क तुटून ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच रुग्णांचे  हाल होत आहेत. त्याला सर्वस्वी चिपी विमानतळ प्राधिकरण जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे  म्हणणे आहे .निवेदन मिळाल्यानंतर 16  जानेवारीपूर्वी पर्यायी रस्ते तयार करून वाहतुकीस खुले करावेत किंवा पूर्वीपासून चिपी विमानतळाच्या संपादित जमिनीतून गेलेले सर्व रस्ते सुस्थितीत करून वाहतुकीस खुले करावेत अन्यथा ग्रामस्थ चिपी विमानतळाच्या ठिकाणी 26 जानेवारी  रोजी तीव्र आंदोलन छेडतील, असा  इशारा दिला आहे.