Wed, Feb 20, 2019 04:28होमपेज › Konkan › खासगी क्षेत्रातील वृक्षतोड परवानगीचे निर्बंध शिथिल करण्याची मागणी

खासगी क्षेत्रातील वृक्षतोड परवानगीचे निर्बंध शिथिल करण्याची मागणी

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 10:23PM

बुकमार्क करा
 

कणकवली : प्रतिनिधी

खाजगी क्षेत्रातील वृक्षतोड परवानगीचे निर्बंध शिथील करावेत, ग्रामीण भागामध्ये असणारी इंटरनेट कनेक्टीव्हीटीची अडचण लक्षात घेवून शेतकर्‍यांचे ऑफलाईन प्रस्ताव स्विकारण्यात यावेत, अशी मागणी माजी आ. डॉ. विनय नातू आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची भेट घेवून केली. जसा पश्‍चिम महाराष्ट्राचा शेतकरी ऊसाच्या शेतीवर अवलंबून असतो तसा कोकणातील शेतकरी त्याच्या घरच्या लग्नकार्याला, अडीअडचणीला स्वत:च्या मालकीची झाडे विकून पैसे मिळवतो.

मात्र, ही मालकी हक्काची झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. मात्र, प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी 2 जानेवारी 2017 च्या पत्रानुसार संबंधित शेतकर्‍याच्या सातबारावर भोगवाटदार वर्ग 1 असल्यास तहसीलदार अथवा नायब तहसीलदार यांच्याकडील प्रमाणपत्र घेणे आवश्यक नसल्याचे कळविले आहे. त्यांचा अंतर्भाव शासन निर्णयात करण्यात यावा. ऑनलाईनची अडचण लक्षात घेवून ऑफलाईनचे अर्ज स्वीकारावेत अशी मागणी वनमंत्र्यांकडे डॉ. नातू आणि अतुल काळसेकर यांनी केली. यावेळी वनमंत्र्यांनी याबाबत  नियम  तपासून शेतकर्‍यांच्या सोयीच्यादृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश वनसचिवांना दिले आहेत.