Mon, Jul 22, 2019 14:04होमपेज › Konkan › तलाठी दाखवा, बक्षीस मिळवा!

तलाठी दाखवा, बक्षीस मिळवा!

Published On: Apr 23 2018 11:12PM | Last Updated: Apr 23 2018 10:55PMमालवण : प्रतिनिधी

महसूल प्रशासनाकडून सात-बारा संगणकीकृत करण्याचे काम तलाठ्यांकडून सुरू असल्याने नागरिक व शेतकर्‍यांची कामे खोळंबली आहेत. याबाबत महसूल प्रशासनाचा निषेध म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मालवण तलाठी कार्यालय येथे सोमवारी ‘तलाठी दाखवा, बक्षीस मिळवा’ हे अनोखे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी सरकारविरोधी घोषणा देत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध व्यक्‍त केला. 

मालवण तलाठी कार्यालयात डिसेंबर 2017 पासून बंदावस्थेत आहे. शहारासह तालुक्यातील शेतकरी वनागरिकांना तलाठी नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने काँग्रेसच्या वतीने हे तालुकाध्यक्ष महेश अंधारी व सरचिटणीस अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी सचिव वीरेश देऊलकर, भगवान लुडबे, जीवन भोगावकर, दिलीप तळगावकर यांच्यासह तलाठी कार्यालयात फेर्‍या मारणारे नागरिक उपस्थित होते.

सातबारा ऑनलाईन करण्याचे काम सुरू असल्याने महसूल प्रशासनाने जनतेच्या सोयीसाठी आठवड्याच्या पहिल्या सोमवारी तलाठी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते. मात्र, गेले चार महिने तलाठी कार्यालयात तलाठ्यांचे दर्शन होत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी याना सातबारा, फेरफार, उत्पन्‍न दाखला आदी महत्वाची कागदपत्रे मिळविण्यासाठी बंद तलाठी कार्यालयात फेर्‍या माराव्या लागत असून त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तलाठी कार्यलयात तलाठी उपलब्ध करून दिल्यास राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीय तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा  तालुकाध्यक्ष महेश अंधारी दिला.