Tue, Mar 26, 2019 12:13होमपेज › Konkan › मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात सख्ख्या भावांचा मृत्‍यू 

संगमेश्‍वर : एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Published On: Apr 29 2018 11:55AM | Last Updated: Apr 29 2018 3:09PMसंगमेश्‍वर : वार्ताहर

मुंबई ते काजिर्डा जाणारी स्कॉर्पिओ आणि रत्नागिरी ते चिपळूण जाणार्‍या ट्रकची जोरदार धडक झाल्याने या अपघातात स्कॉर्पिओमधील रवींद्र विठोबा पवार (वय 45) त्यांचे भाऊ अनिल विठोबा पवार (45, दोघेही रा. कार्जिडा, ता. राजापूर) हे दोघे जागीच ठार झाले. या अपघातातील रसिका रवींद्र पवार (40) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अपर्णा अनिल पवार (40) या गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी सकाळी 7 वा. मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी येथे झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे.

 स्कॉर्पिओ रवींद्र पवार चालवीत होते. सकाळी 7 वा.च्या सुमारास रत्नागिरी ते चिपळूण जाणारा ट्रक (एमएच 08- डब्ल्यू 1414) धामणी येथील श्रद्धा हॉटेलजवळ आला असताना जोरदार धडक बसून स्कॉर्पिओमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. 

अपघाताची खबर मिळताच संगमेश्‍वर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. नरेंद्र महाराज संस्थानचे चालक प्रसाद सप्रे व ग्रामीण रुग्णालयाची अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी जाऊन पवार कुटुंबीयांना संगमेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु, दोन महिला गंभीर असल्याने त्यांना रत्नागिरी येथे शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना  रसिका पवार यांचा मृत्यू झाला, तर अपर्णा पवार या गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास संगमेश्‍वर पोलिस करीत आहेत. 

दरम्यान, शनिवारी महामार्गावर तीन अपघातात पाचजण ठार झाले होते. या अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी धामणीनजीक झालेल्या या अपघातातील ट्रकची पुढील दोन चाके निखळली असल्याने अपघाताची भीषणता लक्षात येते. हा ट्रक झाडावर जाऊन आदळला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला.

Tags : mumbai goa highway, gruhagar, accident,  brother