होमपेज › Konkan › पेंढरीतील सूर्यकांत गुरव यांचा खूनच!

पेंढरीतील सूर्यकांत गुरव यांचा खूनच!

Published On: Feb 10 2018 1:32AM | Last Updated: Feb 09 2018 10:20PMदेवगड ः प्रतिनिधी

पेंढरी-भटाचा पाणवठा या ओहोळात आढळलेल्या सूर्यकांत ठकोजी गुरव (वय 55) यांचा मृत्यू प्रकरणाचा उलगडा झाला आहे.अनैतिक संबंध पाहिल्यानेच त्यांचा खून झाल्याचे विजयदुर्ग पोलिसांनी उघड केले आहे. याप्रकरणी नूतन (40) व भिकाजी आत्माराम गुरव ऊर्फ नातू (55, दोन्ही रा.पेंढरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दोघांनीही गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेंढरी येथील सूर्यकांत ठकोजी गुरव यांचा मृतदेह 29 जानेवारी 2017 रोजी दुपारी 12.30 वा.च्या सुमारास पेंढरी भटाचा पाणवठा या ओहोळात त्यांचा मुलगा समीर याला आढळून आला होता. ते 28 जानेवारी रोजी 11.30 वा. सुमारास पेंढरी हायस्कूलच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमातून उठून गेले. मात्र, ते  घरी न पोहोचल्याने घरातील मंडळींनी त्यांची शोधाशोध केली. दुसर्‍या दिवशी त्यांचा मृतदेह ओहोळात आढळून आला.

त्यांचा मृतदेह मिळालेल्या घटनास्थळी 

मोठ-मोठे खडक व दगड आणि वहाळाच्या पाण्याचा वाहता प्रवाह असल्याने त्यावेळी मृत सूर्यकांत गुरव यांच्या डोक्यावर झालेल्या जखमा याबाबत साशंकता निर्माण झाली 
होती.

याप्रकरणी त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्‍त करीत त्यांची पत्नी सुचित्रा यांनी 8 फेब्रुवारी 2018 रोजी विजयदुर्ग पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी घातपातप्रकरणी संशयित नूतन (40) व भिकाजी आत्माराम गुरव ऊर्फ नातू (55, दोन्ही रा. पेंढरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. या दोघांनी दिलेल्या जबाबानुसार, वरील दोघांचेही 28 जानेवारी रोजी अनैतिक संबंध सुरू असताना मयत सूर्यकांत गुरव यांनी पाहिले होते. ते आपल्या या संबधांची वाच्यता गावात करतील या भीतीने भिकाजी व वनीता या दोघांनी त्यांच्यावर हत्याराने वार करुन वहाळात मरणासन्‍न अवस्थेत  ढकलून दिल्याचे पोलिसांकडे कबूल केले आहे.
विजयदुर्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अतिशय कौशल्याने तपास करून अकरा दिवसांत संशयितांना गजाआड केले आहे.