Mon, Apr 22, 2019 12:10होमपेज › Konkan › वाघिवणे धरणाचा वाद शासन दरबारी

वाघिवणे धरणाचा वाद शासन दरबारी

Published On: Apr 27 2018 10:26PM | Last Updated: Apr 27 2018 9:15PMदापोली : प्रवीण शिंदे

वाघिवणे-बोरथळ धरणातील पाणी अन्य कोणालाही देणार नाही, या भूमिकेवर वाघिवणे-बोरथळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ ठाम आहेत. याबाबतचा वाद आता शासन दरबारी जाऊन पोहोचला आहे.
1997 साली वाघिवणे - बोरथळ या धरणाची पायाभरणी झाली होती तर  येथील ग्रामस्थांच्या शेतीसाठी या धरणातून पाणी उपलब्ध करून दिले जाईल, या तत्त्वावर येथील सुकोंडी, वाघिवणे-बोरथळ, इळणे, लोणवडी येथील ग्रामस्थांनी आपल्या शेतजमिनी शासनाला दिल्या. डौली, घोरपडेवाडी आणि आताची नवानगर बोरथळ या एका वाडीचे पुनर्वसनदेखील केले आहे. या धरणाचे 90 टक्के काम 2010 साली पूर्ण झाले असून या धरणाच्या सांडव्याचे काम अपूर्ण आहे, अशी माहिती लघुपाटबंधारे उपविभाग दापोलीचे बी. एम. मुंडे आणि दिलीप जोखार यांनी दिली.

प्रत्यक्षात धरणाला मोठी गळती लागली असून 2008 सालापासून या धरणामध्ये 70 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहत आहे, असे लघुपाटबंधारे उपविभाग दापोली यांचे म्हणणे आहे.  ग्रामस्थांचे मात्र या उलट म्हणणे आहे. ग्रामस्थ म्हणतात की, धरणामध्ये गळतीमुळे 50 टक्केपेक्षा कमी साठा राहत आहे. यातील 2.14 हेक्टर पाणी येथील पाच गावांच्या सिंचनासाठी  देण्याचे शासनाच्या दप्तरी नमूद आहे. यातील 15 टक्के पाणी औद्योगिक किंवा पर्यटनासाठी देण्याची तरतूद या धरणाच्या करारामध्ये आहे. या अटीवर हर्णै अडखळ बायपास येथे जागा खरेदी करून त्या ठिकाणी पर्यटनासाठी मुकुंद दंडवते यांनी 78 घनमीटर पाण्याची मागणी दापोली लघुपाटबंधारे विभागाकडे केली. मात्र 4319 घनमीटर इतका जलसाठा धरणामध्ये उपलब्ध असेल तर 15 टक्के औद्योगिक क्षेत्रासाठी किंवा पर्यटनासाठी पाणी देण्याची व्यवस्था करण्यात येते, अशी लघुपाटबंधारेची अट आहे.

धरणामध्ये नियोजित साठ्याच्या निम्याहून अधिक साठा नसल्याने आणि धरण कोरडे पडत चालले आहे. येथील स्थानिकांना आणि कवडीमोलामध्ये धरणासाठी जमिनी दिलेल्या जमीनधारकांवर अन्यायच होत आहे. असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या धरणासाठी बुडीत क्षेत्रामध्ये डौली, तुरवले, चांदिवणे, सुकोंडी, वाघिवणे अशी गावे लाभ आणि बुडित क्षेत्रामध्ये आहेत. त्यामुळे या ग्रामस्थांनी धरणातील पाणी अन्य कोणालाही न देण्यासाठी विरोधाचे हत्यार उपसले आहे. याबाबत ग्रामस्थांनी दापोली तहसीलदारांसह निवेदन दिले आहे. 

पाण्यासाठी चाललेल्या या संघर्षामध्ये दंडवते यांनी पाण्याची परवानगी घेऊन पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई सुरु केली. मात्र, ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे. तात्पुरत्या स्वरुपात हे काम बंद राहिल. पुन्हा शासनाकडून याबाबत काम चालू करा, असे आदेश आल्यानंतर काम सुरु होईल, असे लघुपाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.  

धरणाचे पूर्ण काम करा आणि 4319 घनमीटर साठा असेल तर खुशाल पाणी द्यावे, अशी ग्रामस्थांनी भूमिका घेतली असून या धरणाच्या वादाचा चेंडू शासन दरबारी पोहचला आहे.