Fri, Jul 19, 2019 23:08होमपेज › Konkan › सरोवर संवर्धनातून होणार दापोलीचा विकास

सरोवर संवर्धनातून होणार दापोलीचा विकास

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 11 2017 11:06PM

बुकमार्क करा

दापोली : प्रतिनिधी

दापोली मतदारसंघातील 7 गावांमधील तलावांचे सुशोभिकरण व संवर्धन करण्यासाठी शासनाने सरोवर संवर्धन योजने अंतर्गत 7 कोटी बारा लाख आठ हजार तीनशे रूपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती योगेश कदम यांनी दापोली येथे माहिती  दिली. यामध्ये दापोली तालुक्यातील गावतळे, जालगाव, मुरूड, उंबरघर, गिम्हवणे, विरसई या सहा तर मंडणगड तालुक्यातील कुंभार्ली या गावाचा समावेश आहे.

दापोली तालुक्यातील बुरोंडी, उंबरशेत, जामगे  तर मंडणगड तालुक्यातील केरीळ येथील गावतळ्यांचे प्रस्तावही लवकरच मंजूर होतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. मंजूर निधीपैकी 50 टक्के निधीचे धनादेश संबंधित ग्रा.पं.कडे पर्यावरणमंत्री ना. रामदास कदम यांच्या हस्ते सुपूर्दही करण्यात आले आहेत.

राज्यातील तलाव, सरोवरे व मोठे जलाशय यांचे पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने 2006-07 या वर्षापासून राज्य सरोवर संवर्धन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तलावाच्या पाण्याचे प्रदूषण करणारे स्त्रोत निश्‍चित करून प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना, तलावात साचलेला घातक व ऑरगॅनिक गाळ उपसा तसेच तलावाची गुणवत्ता टिकविण्यासाठी तलावातील अनावश्यक व उपद्रवी वनस्पती नष्ट करून त्यांची वाढ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना अशा प्रकारची विविध कामे केली जातात. याचबरोबर तलावाच्या किनार्‍याचे सौंदर्यीकरण करून हरितपट्टा, मनोरंजनासाठी बालोद्यान, जलाशयात नौकाविहार आदी कामे केली जातात. या योजनेतून 10 टक्के लोकसहभाग तर 90 टक्के राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येतो.

या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेने दापोली मतदारसंघातील एकूण 11 गावांचा प्रस्ताव पर्यावरण विभागाला सादर केला होता. यापैकी पहिल्या टप्प्यात 7 गावांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून या निधीपैकी 50 टक्के निधी ग्रामपंचायतींना प्राप्त झाला आहे. 

दापोली तालुक्यातील गावतळे येथील तलावाकरिता 1 कोटी 80 लाख, जालगावकरिता 1 कोटी 20 लाख, मुरूड 70 लाख, उंबरघर व गिम्हवणे 40 लाख, विरसई 80 लाख तर मंडणगड तालुक्यातील कुंभार्ली गावासाठी 1 कोटी 80 लाख रूपयांच्या प्रस्तावास निधी प्राप्त झाला आहे. 

गेली पंधरा वर्षे मतदारसंघातील विकासकामे ठप्प झाली होती, मात्र, पर्यावरणमंत्री ना. रामदास कदम यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा विकासकामांचा धडाका सुरू केला असून या कामांचा दर्जा व गुणवत्ता टिकविण्यासाठी आपण स्वत: लक्ष ठेऊन असणार असल्याची माहिती योगेश कदम यांनी यावेळी दिली