Tue, Mar 19, 2019 05:50होमपेज › Konkan › निरंजन उलटून घराला आग; एका महिलेचा होरपळून मृत्यू

निरंजन उलटून घराला आग; एका महिलेचा होरपळून मृत्यू

Published On: Mar 14 2018 10:29PM | Last Updated: Mar 14 2018 10:25PMदापोली : वार्ताहर

तालुक्यातील हर्णै मल्लखांबपेठ येथे मंगळवारी रात्री एका घराला अचानक आग लागली. या आगीत 55 वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू झाला. शैला हेदूकर या यामध्ये मृत्यूमुखी पडल्या तर संपदा हेदूकर जखमी झाल्या आहेत. 

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. घरातील कुटुंबीय देवाजवळ आरती करीत असताना पेटते निरंजन अंगावर पडल्याने संपदा हेदूकर यांच्या गाऊनने पेट घेतला. त्यांच्या शेजारी आरतीसाठी उभ्या असलेल्या यांच्याही गाऊनने पेट घेतला. या दोघींना वाचविण्याच्या प्रयत्नात घरातील साहित्यानेही पेट घेतला आणि संपूर्ण घराला आगीने वेढले. या दुर्घटनेत शैला हेदूकर या होरपळल्या. ग्रामस्थांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी ग्रामस्थांकडून माती आणि पाण्याचा मारा करण्यात आला. त्यात त्यांच्या घरावरून महावितरणची उच्च विद्युतभारित वाहिनी जात असल्याने पुढचा धोका लक्षात घेत वीजपुरवठा खंडित करण्यात आला. दापोली नगरपंचायतीचा अग्निशमन बंब मागविण्यात आला. यामध्ये घराचे नुकसान झाले असून दीड तासांनंतर आग विझली. या बाबत पंचनामा करण्यात आला. आगीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शैला हेदूकर यांचा मृतदेह विच्छेदनासाठी दापोली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला, तर जखमी संपदा हेदूकर यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.