Wed, Dec 11, 2019 11:08होमपेज › Konkan › कोकण कृषी विद्यापीठाने शोधली ‘कोकण भेंडी’

कोकण कृषी विद्यापीठाने शोधली ‘कोकण भेंडी’

Published On: Jun 20 2019 1:58AM | Last Updated: Jun 19 2019 11:28PM
दापोली : वार्ताहर

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील शेतकर्‍यांसाठी खास खरीप हंगामात उत्तम उत्पन्न देणारी भाजी प्रवर्गातील ‘कोकण भेंडी’ नावाची नवीन हायब्रिड बियाणे शोधून काढले आहे. खरीप हंगामात शेतकर्‍यांसाठी पूरक उत्पन्न देणारी व भेंडीवर पडणार्‍या मोझेक या विषाणूजन्य रोगला बळी न पडणारी जात शोधून काढण्यात कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. आजवर या कृषी विद्यापीठाने संशोधनाअंती शिफारस केलेली कोकण भेंडी ही भेंडीची पहिली जात ठरली आहे.

कुलगुरु डॉ. संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाअंती शिफारस करण्यात आलेली भाजी वर्गातील भेंडी ही पहिली जात आहे. कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. 29 ते 31 मे दरम्यान राहुरी कृषी विद्यापीठ येथे झालेल्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या संयुक्त संशोधन परिषदेत या जातीच्या शिफारशीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

या बैठकीला कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत, कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, विस्तार संचालक डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ.सतीश नारखेडे आदी शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते.
या भेंडीच्या भाजीचे रोप हे सरळ वाढते. त्याला उपशाखा फुटत नसल्याने उत्पन्नही चांगले येत असल्याचा अंतिम निकर्ष नोंदविण्यात आला आहे. दापोली तालुक्यातील वाकवली येथील संशोधन प्रक्षेत्रावर या जातीचे संशोधन गेले सहा ते आठ वर्षे चालू होते. 

संपूर्ण कोकणात सगळ्या प्रक्षेत्रावर व काही शेतकर्‍यांच्या बांधावर या जातीचे दोन वर्षे लागवड करुन विविध चाचण्या घेऊन अभ्यास करुन ही संशोधन शिफारस करण्यात आली आहे. ही हायब्रिड व्हरायटी शोधून काढताना ज्या भेंडीच्या दोन मूळ जातींचा उपयोग केला गेला त्यापेक्षा कोकण भेंडीचे उत्पन्न हे सुमारे 20 टक्के अधिक म्हणजेच हेक्टरी 135 क्विंटल उत्पन्न मिळत असल्याचा अंतिम निष्कर्ष कृषि शास्त्रज्ञांनी नोंदविला आहे.