Tue, Mar 26, 2019 22:19होमपेज › Konkan › किनारी भागाला उधाणाचा धोका

किनारी भागाला उधाणाचा धोका

Published On: Jul 16 2018 11:18PM | Last Updated: Jul 16 2018 10:21PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात 16 ते 19 जुलै या कालावधीत  मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील किनारपट्टी भागात उधाणाचा धोका असून किनारी गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी केले आहे. 

जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाने झोडपले. सोमवारी पावसाने जिल्ह्यात  बहुतांश भागात संततधार ठेवली, तर  काही भागात जोरदार पाऊसही झाला. रविवारी किनारी भागात उधाणाचे संकट होते. किनारी भागात जोराच्या लाटा उठल्याने किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक बंधार्‍यांची पडझड झाली.  आगामी काळातही हा धोका कायम असून किनारपट्टी भागात  सावधगिरी बाळगण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

मंगळवारी जिल्ह्यात 49.89 मि. मी. सरासरी पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड 110, दापोली 25, खेड 55 , गुहागर 5, चिपळूण 51, संगमेश्‍वर 52, रत्नागिरी 10, लांजा 46 आणि राजापूर तालुक्यात 95 मि. मी. पाऊस झाला. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने चिपळूण तालुक्यात एका घराच्या पडझडीत 45 हजारांचे नुकसान झाले.