Thu, Jul 18, 2019 17:08होमपेज › Konkan › दादर-रत्नागिरी पॅसेंजरमधील बाळासाठी धावली कासूची ‘हिरकणी’

दादर-रत्नागिरी पॅसेंजरमधील बाळासाठी धावली कासूची ‘हिरकणी’

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 16 2018 10:25PMरत्नागिरी : राजेंद्र पाष्टे

शिवकालीन इतिहासात हिरकणी नावाच्या महिलेने आपल्या सानुल्याच्या वात्सल्यापोटी रायगडाचा बुरूज  उतरून ‘बाळासाठी कायपण’ करण्याचे साहस केले होते. या साहसाचे कौतुक करताना शिवाजी महाराजांनी ‘त्या’ बुरूजाला हिरकणीचे नाव देऊन सन्मान केला होता. 

आधुनिक काळातही अशा ‘हिरकणी’ धावल्याचा प्रत्यय अलीकडेच दादर-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये आला. पॅसेंजरमध्ये दुधासाठी व्याकुळ झालेल्या बाळासाठी थेट कासू (जि. रायगड) येथून एक हिरकणी धावली. तीन महिन्यांचे बाळ दुधासाठी व्याकुळ झालेले आहे, या संदेशाने केवळ तिने थेट कासू स्थानक गाठले आणि त्या बाळाच्या दुधाची व्यवस्था केली. रत्नागिरी दादर पॅसेंजरमध्ये हा प्रकार शनिवारी घडला.

दापोली येथील बामणे दाम्पत्य मुंबईत जाण्यासाठी चिपळूण येथे रेल्वेत चढले. त्यांच्याबरोबर  त्यांची तीन महिन्यांची प्रांजल नावाची  मुलगी होती. तीन महिन्यांच्या बाळाची प्रवासातील सर्व तजवीज त्यांनी केली होती. मात्र, प्रवासादरम्यान ती रडू लागली. ओटीपोटात दुखत असेल म्हणून त्याच्या आईने सर्व प्राथमिक उपाय करून पाहिले. मात्र, तिचे रडणे काही थांबत नव्हते. प्रांजलच्या आईचे अंगावरील दूध कमी पडत असल्याने तिला बाहेरील दुधाचा अतिरिक्‍त रतीब पुरवावा लागायचा. मात्र, नेमकी हीच बाब या दाम्पत्याच्या प्रवासाच्या गडबडीत लक्षात आली नव्हती. दूध नसल्यामुळे प्रांजलचे रडणे थांबता थांबत नव्हते.  

बाळ रडत असल्याने सहप्रवाशांनाही वेगवेगळे उपाय सांगितले. मात्र, ते निष्फळ ठरले.  अखेर या गाडीत असलेल्या सहप्रवासी अर्चना ठाकूर यांंनी वीर स्थानकाच्या दरम्यान या मार्गावरील कासू स्थानक येथे गावात  राहत असलेल्या आपल्या बहिणीला ही बाब मोबाईलवरून संदेशाद्वारे कळवली.

त्यानंतर लगेचच कासू येथील रंजना बोरकर यांनी फोेन करून बाळाची विचारपूस आईवडिलांकडे केली. केवळ मोबाईवरील संदेशावरून त्यांनी बाळाची गरज ओळखली. गाडीचा प्रवास वीर येथून नागोठण्यापर्यंत झाला तेव्हा  पुन्हा बोरकर यांनी फोन करून या घटनेचे अपडेट घेतले. दरम्यानच्या काळात रंजना बोरकर यांनी नवीन दुधाची बाटली, बाळासाठी आवश्यक लागणारे कपडे, पाणी आणि दुधाची तजवीज करून ठेवली. पॅसेंजरने नागोठणे सोडल्यानंतर पुन्हा बोरकर यांनी फोन करून गाडीतील बाळाच्या स्थितीची विचारपूस केली. दरम्यानच्या काळात सहप्रवाशांनी प्रांजलसाठी गाडीतच पाळणाही केला. पाळणा करूनही प्रांजलचे रडणे थांबत नव्हते.

अखेर गाडी कासू स्थानकात पोहोचल्यानंतर रंजना बोरकर या सारी तजवीज करून तयारीनिशी ठरलेल्या ठिकाणी येऊन उभ्या राहिल्या. गाडी थांबल्यानंतर सोबत आणलेली दुधाची बाटली बाळाच्या स्वाधीन केली. दुसर्‍या मिनिटाला बाळाचे रडणे थांबले. तीन तासांच्या प्रवासात दुधाने व्याकुळ झालेले बाळ रडायचे थांबले अन् आईवडिलांच्या चेहर्‍यावरही समाधान उमटले.

थेट कासूवरून आलेल्या ‘हिरकणी’ने बाळाच्या दुधासाठी केलेली ही खटाटोप बघून बामणे कुटुंबही भारावून गेले.  बोरकर यांनी केवळ बाळासाठी दूधच न आणता ताजे पाणी, त्यासाठी कपडे आणले होते. छोट्या प्रांजलची स्थिती पाहून दुधाची भूक भागवण्यासाठी रंजना बोरकर यांनी धावपळ केली. कोणतीही ओळख नसताना बाळासाठी केलेल्या या प्रयत्नाने प्रवासीही भारावले.