Fri, Apr 26, 2019 19:33होमपेज › Konkan › ...आता ‘क्रश सँड’ने बांधा घरे!

...आता ‘क्रश सँड’ने बांधा घरे!

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 11 2018 10:54PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणातील खाड्यांतून होणारा अनिर्बंध आणि अवैध वाळू उपसा, त्यामुळे खाडी किनार्‍यांची बदलत चाललेली भौगोलिक रचना आणि त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी आता कोकणात कृत्रिमरीत्या तयार करण्यात येणार्‍या ‘क्रश सँड’ वापरण्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. लवकरच याबाबत बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेल्यांसाठी एका कार्यशाळेचे आयोजन प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. 

खाड्यांमध्ये चालणार्‍या अवैध वाळू उपशावर पूर्णपणे निर्बंध आणण्यासाठी कोकणात हे प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत. भविष्यात खाडीच्या वाळूला पर्याय म्हणून आता क्रश सँडचाच वापर करावा लागणार आहे. येत्या तीन वर्षांत नैसर्गिक वाळू पूर्णपणे बंद होण्याचे संकेत पर्यावरण तज्ज्ञांतून व्यक्‍त करण्यात येत आहे. त्यामुळे खाड्यांचे नैसर्गिक पर्यावरण धोक्यात आले आहे. त्यासाठी पर्याय म्हणून पर्यावरणपूरक व किफायतशीर अशा क्रश सँडचा वापर फायदेशीर ठरणार आहे.

नैसर्गिक वाळूपेक्षा क्रश सँडची किंमत फार कमी आहे. हा दर सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखा आहे. या वाळूमुळे चांगल्या प्रतीचे बांधकाम होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. मोठ्या शहरातही या वाळूूला मागणीही वाढत आहे. त्यामुळे घरांसह व्यावसायिक इमले उभारणेही  स्वस्त होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई, पुण्यासारख्या महानगरात एम. सँडचा वापर प्रभावीपणे सुरू आहे. मात्र, याबाबत वाळू व बांधकाम क्षेत्रात संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी रत्नागिरीत प्रशासकीय स्तरावर लवकरच एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.