Tue, Jun 25, 2019 15:39होमपेज › Konkan › मोती तलावात मासे पकडताना जाळ्यात सापडली मगर

मोती तलावात मासे पकडताना जाळ्यात सापडली मगर

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 12:26AM
सावंतवाडी ः प्रतिनिधी

सावंतवाडी शहरातील संस्थानकालीन मोती तलावात  मासे पकडताना मच्छीमारांच्या जाळ्यात सुमारे तीन फूट लांबीची मगर अडकली. यावेळी मच्छीमारांची त्रेधातिरपट उडाली. ही घटना त्यांनी  नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कानी घातल्यानंतर  वनविभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. वनविभागाच्या पथकाच्या मदतीने या मगरीला  जेरबंद करत तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली.

 काही महिन्यांपूर्वी मोती तलावात  मगर असल्याचे काही प्रत्यक्षदर्शीने पाहिले होते. त्यानंतर या मगरीला पकडण्यासाठी तलावातील सर्व पाणी सोडून तलाव कोरडा करण्यात आला होता.  त्यावेळी मगर किंवा तिची पिल्ली आढळली नव्हती.   शुक्रवारी दुपारी 12 वा. च्या सुमारास  मासे पकडणार्‍या तिघा युवकांना  त्यांच्या  जाळ्यामध्ये  मगर अडकल्याचे दिसून आले. त्यांनी घाबरून किनार्‍याकडे धाव घेतली. दरम्यान,  वनविभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. वन कर्मचार्‍यांनी या मगरीची जाळ्यातून सुटका करत तिला ताब्यात घेतले. सुमारे तीन फूट लांबीची ही मगर होती.  मगरीला पाहण्यासाठी नागरिकांनी तलावाच्या काठावर गर्दी केली होती. गेले दोन दिवस सावंतवाडी शहरातील मोती तलावात मासे पकडण्याचे काम सुरू असून  शुक्रवारी दुपारपर्यंत सुमारे 750 किलो मासे पकडण्यात आल्याची माहिती नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाचे भाऊ भिसे यांनी दिली.