Sat, Dec 07, 2019 14:58होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : ३५० रिफायनरी विरोधकांवर गुन्हे

सिंधुदुर्ग : ३५० रिफायनरी विरोधकांवर गुन्हे

Published On: Aug 19 2018 11:05PM | Last Updated: Aug 19 2018 11:02PMदेवगड ः प्रतिनिधी

 विजयदुर्ग-तळेरे मार्गावर रामेश्‍वर काटे कोलवाडी येथे बेकायदेशीर जमाव जमवून वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी व मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विजयदुर्ग पोलिसांनी सुमारे 300 ते 350 रिफायनरी विरोधकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये गिर्ये, विजयदुर्ग या गावच्या सरपंचांसह व गिर्ये-रामेश्‍वर प्रकल्प विरोधी संघर्ष समिती अध्यक्षांचाही समावेश आहे. शनिवारी सायंकाळी उशिरा विजयदुर्ग पोलिसांनी ही कारवाई   केली.

शनिवारी विजयदुर्ग-तळेरे मार्गावर रामेश्‍वर काटे-कोलवाडी येथे रिफायनरी विरोधकांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांची गाडी अडवून त्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने केली होती.यामध्ये रामेश्‍वर सरपंच विनोद सुके, गिर्ये सरपंच रूपेश गिरकर, गिर्ये संघर्ष समिती अध्यक्ष मुनाफ ठाकूर, रामेश्‍वर संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश केळकर, नासीर मुकादम यांच्यासहीत असंख्य रिफायनरी प्रकल्पाविरोधी स्थानिक जनता सहभागी झाली होती.

रिफायनरी विरोधात तसेच प्रमोद जठार यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलकांनी दीड तास ठिय्या आंदोलन केले होते.

या आंदोलनामुळे विजयदुर्ग मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. विजयदुर्ग पोलिसांनी भादंवि कलम 341, 143, 149 व मुंबई पोलिस अधिनियम 135 अन्वये रामेश्‍वर काटे कोलवाडी येथे विजयदुर्ग-तळेरे मार्गावर बेकायदेशीर जमाव जमवून वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी व मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी रामेश्‍वर सरपंच विनोद सुके, गिर्ये सरपंच रुपेश गिरकर, गिर्ये संघर्ष समिती अध्यक्ष मुनाफ ठाकूर, रामेश्‍वर संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश केळकर, नासीर मुकादम यांच्यासह सुमारे 300 ते 350 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.