Wed, Jun 26, 2019 17:50होमपेज › Konkan › तरूणांना लाखोंचा गंडा घालणार्‍या तोतया आयकर अधिकार्‍याच्या मुसक्या आवळणार

तरूणांना लाखोंचा गंडा घालणार्‍या तोतया आयकर अधिकार्‍याच्या मुसक्या आवळणार

Published On: Jul 16 2018 9:09PM | Last Updated: Jul 16 2018 9:09PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून  जिल्ह्यातील शेकडो तरूणांची लाखो रूपयांची फसवणूक केल्याची धक्‍कादायक माहिती समोर येत आहे. आयकर अधिकारी असल्याचे खोटे सांगून करून ही फसवणूक करण्यात आली आहे. यासाठी तालुक्यातील काळबादेवी येथील काहीजणांना हाताशी धरून कोल्हापूर येथील अमोल तोडकरी याने तरूणांकडून लाखो रूपये उकळल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच महिन्यांपूर्वी तक्रार अर्ज देऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने फसवणूक झालेल्या तरूणांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर आता कारवाईला चालना मिळाली आहे. 

याबाबत सुमारे पाच महिन्यांपूर्वी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात उमेश कनगुटकर, ऋषिकेश जोशी, दिपेश खवळे, उपेंद्र मालगुंडकर, अमर धातकर, प्रशांत पाटील, आशिष बेलवणकर, रेश्मा दरिद्दर यांनी ग्रामीण  पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, काळबादेवी येथील नरेश मयेकर, संगीता जोशी, महेश जोशी यांनी सरकारी नोकरीला लावण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी  कोल्हापूर येथील अमोल तोडकरी यांचे नाव पुढे करण्यात आले. तोडकरी हे इन्कमटॅक्स अधिकारी असून ते मुलांना सरकारी नोकरी लावतात. ते आमच्या ओळखीचे असून तुमचे काम करून देतो, असे नरेश मयेकर यांनी तक्रारदारांना सांगितले होते. ऑगस्ट 2016 मध्ये नोकरीला लावण्यासाठी अमोल तोडकरी याचे साहेब म्हणून संतोष कांबळे यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 30 हजार आणि रोख 20 हजार तसेच मूळ कागदपत्रे देण्यात आली होती. त्यानंतर नोकरीसाठी इच्छुक तरूणांना अमोल तोडकरी हे मोठे अधिकारी असून त्यांचे वडील मंत्री आहेत. ते वापरत असलेली इनोव्हा कार त्यांच्या आईची आहे. ते काळबादेवी येथे स्थायिक होणार आहेत, असे नरेश मयेकर याने सांगितले होते. त्यानंतर सप्टेंबर 2016 मध्ये नोकरी लावण्यासाठी तक्रारदारांना मुंबईतील इंदिराडॉक, केईएम हॉस्पिटल येथे नेण्यात आले होते. तरूणांना गेटबाहेर उभे करून अमोल तोडकरी तेथील कार्यालयात जाऊन बाहेर आला व थोड्या दिवसांत तुमचे काम होईल, असे आश्‍वासन दिले. वारंवार अशी आश्‍वासने या सर्वांकडून देण्यात आली होती.  

याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु, तत्कालीन पोलिस अधिकार्‍यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. ग्रामीण पोलिसांनी पाच महिने कोणतीच कारवाई न केल्याने अखेर तक्रारदारांनी  काही दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्याकडे तक्रार केली. ग्रामीण पोलिस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी जुन्या तक्रारींचा आढावा घेतला. यावेळी या फसवणुकीच्या तक्रारीची दखल घेत आवश्यक ती कागदपत्रे गोळा केली आहेत. बँक खात्यासह मोबाईल लोकेशन घेण्यात आले आहे. त्या आधारे लवकरच गुन्हा या गुन्ह्याचा तपास सुरु होणार आहे.