Fri, Jul 19, 2019 20:37होमपेज › Konkan › चिपळूणच्या नगराध्यक्षांना नैतिक अधिकार नाही

चिपळूणच्या नगराध्यक्षांना नैतिक अधिकार नाही

Published On: Jun 02 2018 11:13PM | Last Updated: Jun 02 2018 10:44PMचिपळूण : शहर वार्ताहर 

भ्रष्टाचाराचा ठपका असलेल्या नगराध्यक्षाना दुसर्‍याला भ्रष्ट बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. जनतेला सांगण्यासारखे आता काही नसल्याने सत्ताधारी आता वैयक्‍तिक टीका टिपण्णी करू लागले आहेत, अशी टीका माजी नगरसेवक बरकत वांगडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे न. प. सत्ताधार्‍यांवर केली आहे. 

वांगडे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, जनतेने आम्हाला पुण्य कमविण्यासाठी पालिकेत पाठविले आहे, असा समज आणि आत्मविश्‍वास झाल्याने सत्ताधारी गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत. मुख्याधिकारी दोषी असतील तर कारवाई होणार असे बोलायचे आणि दुसरीकडे चौकशी समितीसमोर जबाब देताना मुख्याधिकारी चांगले काम करीत आहेत. बाहेर जाताना सांगून जातात. अशी पाठराखण करायची अशी वस्तुस्थिती आहे. 

जलतरण तलाव दुर्घटनेनंतर नगराध्यक्षांनी मुख्याधिकार्‍यांना या घटनेला सामोरे जाण्याची सूचना  केली. तसेच रत्नागिरीत जाताना त्यांना परत पालिकेत बोलाविले. मात्र, ते आले नाहीत. याचाच अर्थ नगराध्यक्ष यांचा मुख्याधिकारी आणि प्रशासनावर कोणतेही नियंत्रण आणि वचक नाही हे त्या कबूल करीत आहेत. जलतरण तलावाबाबत मुख्याधिकार्‍यांनी कामाचे आदेश दिले नसतील तर कारवाई होईल, असे सांगितले. मात्र, याबाबतची साधी माहिती या नगराध्यक्षांना नाही. त्यामुळे त्यांना या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही. 

भुयारी गटार योजनेसाठी एक रुपयाही मंजूर नसताना योजनेचा प्रकल्प अहवाल करण्यार्‍या ठेकेदाराला एक कोटी रुपयांचे बिल दिले. सभागृहात न झालेले ठराव आणि खोटे ठराव लिहून कामाचे बेकायदेशीर आदेश देणे, सेनेच्या नगरसेवकांवर विनयभंगाचे खोटे आरोप करून फौजदारी करणे, चौकशीवेळी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज  देण्यास टाळणे, 11 रस्त्यांच्या कामांची दैनंदिन नोंद न करता बिल देणे, मागील सभागृहाने नामंजूर केलेली एलईडी निविदा पुन्हा न काढता त्याच निविदेला मंजुरी देणे, पदाचा दुरुपयोग करून न. प.च्या अस्तित्वात असलेल्या आर्किटेक्ट कामासाठी संदीप गुरव यांची बेकायदेशीर नियुक्‍ती करणे, मर्जीतील ठेकेदारांच्या निविदा मंजुरीसाठी उक्‍ताड येथील आरक्षण विकसित करण्याच्या निविदेत कमी दराच्या निविदा सोडून मर्जीतील ठेकेदाराची जादा दराची निविदा मंजुरीचा प्रयत्न करणे, स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्याच्या कामात मर्जीतील ठेकेदाराला काम न मिळाल्याने कमी दराची निविदा सभागृहासमोर न आणता फेर निविदेचा प्रयत्न, ग्रॅव्हिटी योजनेला सभागृहाची मंजुरी नसताना खोटा ठराव लिहून ठेकेदाराला 80 लाख रुपये अदा करण्यात आले. सत्ताधार्‍यांनी शौचालयसुद्धा सोडले नाही. रस्त्याला बाजूपट्टी मारण्याच्या कामात आपली तोंडे काळी केली आहेत, अशी बोचरी टीका आणि आरोप बरकत वांगडे यांनी प्रसिद्धीपत्रकात केले आहेत.

...तो जिथे जातो तिथे भ्रष्टाचाराची कीड लागते

माझ्यावर टीका करताना एका पेढीवाल्याने चुकीची अंदाजपत्रके बनविल्याचा पुरावा असल्याचा आरोप केला आहे. मात्र, मागील दाराने आलेल्यांना प्रत्यक्ष कामाच्या मोजमापाप्रमाणे बिल दिले जाते, हे कसे कळणार? तो ज्या-ज्या संस्थेत जातो, तेथे भ्रष्टाचारची कीड लागते, अशी टीका  माजी नगरसेवक  बरकत वांगडे यांनी कुणाचेही नाव न घेता केली.