Wed, Jun 26, 2019 18:05होमपेज › Konkan › शेतकर्‍यांना सर्वतोपरी सहकार्य

शेतकर्‍यांना सर्वतोपरी सहकार्य

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 10:47PM

बुकमार्क करा
 

मंडणगड : प्रतिनिधी

शेतकर्‍यांना शेतीसाठी आवश्यक बाबींसाठी जिल्हा बँकेमार्फत आर्थिक तसेच सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रमेश दळवी यांनी केले. रविवार दि. 7 रोजी कुंबळे येथे शेतकर्‍यांच्या शिवारावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कुंबळे येथे शेतकर्‍यांनी समूह शेतीचा प्रयोग करून दहा एकर क्षेत्रामध्ये चवळी, भेंडी, पावटा, घेवडा, कलिंगड, मिरची आदींचे पीक घेतले आहे. या शेतकर्‍यांचा सन्मान करून त्यांच्या कार्यात उत्साह निर्माण व्हावा या संकल्पनेतून कुंबळे  गावचे सरपंच किशोर दळवी यांच्या पुढाकाराने कुंबळे ग्रामपंचायतीच्या वतीने थेट शेतकर्‍यांच्या शिवारावर शेतकरी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रमेश दळवी यांनी मार्गदर्शन केले.

ते पुढे म्हणाले की, तालुक्यात दुबार शेती करण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यात येथील शेतकर्‍यांनी केलेला समूह शेतीचा प्रयोग इतर शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक ठरेल. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मधुकर दळवी यांनी शेतकर्‍यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे वतीने राबवण्यात येणार्‍या योजनांची माहिती दिली.  कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य नितीन म्हामूनकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष माखजनकर यांनीही मार्गदर्शन केले. 
मान्यवरांनी शेतातील पिकांची पाहणी करून योग्य सूचना केल्या, यावेळी शेतकर्‍यांशी  मान्यवरांनी संवाद साधत त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. भरजा नदीच्या बारमाही वाहणार्‍या पाण्याचा योग्य उपयोग करून येथील शेतकर्‍यांनी केलेला समूह शेतीचा प्रयोग मान्यवरांच्या कौतुकास पात्र ठरला. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच किशोर दळवी, उपसरपंच शमीम चिखलकर, ग्रा. प. सदस्य रवींद्र दळवी, महेंद्र पाटील, भारती शिंदे, माजी सरपंच समीक्षा लोखंडे, अमित महाजन, जलाल चिखलकर, ग्रामसेवक बुद, तुकाराम लोखंडे, शांताराम लोखंडे, आदींनी मेहनत घेतली.