Mon, May 20, 2019 20:08होमपेज › Konkan › राजापूर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे अ‍ॅड. खलिफे

राजापूर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे अ‍ॅड. खलिफे

Published On: Jul 16 2018 11:18PM | Last Updated: Jul 16 2018 10:08PMराजापूर : प्रतिनिधी
अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी शिवसेनेचे उमेदवार अभय मेळेकर यांचा 1 हजार 642 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत अ‍ॅड. खलिफे यांना जवळपास 61 टक्के मते देऊन मतदारांनी प्राधान्य दिले. हायटेक प्रचार यंत्रणा राबविणार्‍या भाजप उमेदवाराचे डिपॉझिट मतदारांनी जप्त करायला लावले.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या राजापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. येथील नगरपरिषद इमारतीच्या बॅ. नाथ पै सभागृहात सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. 

उपविभागीय अधिकारी अभय करंगुटकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर तहसीलदार प्रतिभा वराळे या सहाय्यक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. एकूण 8 फेर्‍यांमध्ये मतमोजणी पार पडली. त्यामध्ये शिवसेनेचे अभय मेळेकर यांना पहिल्या व तिसर्‍या फेरीमध्ये आघाडी घेता आली तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. जमीर खलिफे यांना उर्वरित सहा फेर्‍यांमध्ये आघाडी मिळाली.रविवारी एकूण 7 हजार 551पैकी 5 हजार 141 मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. खलिफे यांना 3 हजार 150, शिवसेनेचे अभय मेळेकर यांना 1 हजार 508व भाजपचे गोविंद चव्हाण यांना 422 मते मिळाली. 61 मतदारांनी ‘नोटा’ चा वापर केला. या निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचे गतवेळेपेक्षा मतदान वाढले. तर स्वतंत्र लढलेल्या शिवसेना, भाजप उमेदवारांना  गतवेळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जेवढी मते मिळाली होती, तेवढा आकडाही गाठता आला नाही.भाजप उमेदवाराला आपले डिपॉझिटदेखील वाचविता आले नाही. 

विजयानंतर आघाडीच्या उमेदवारांनी जवाहर चौकात फटाक्यांची आतषबाजी केली. त्यानंतर नूतन लोकनियुक्‍त नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी तेथील शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. अ‍ॅड.जमीर खलीफे मंगळवार दि. 17 जुलैला पदभार स्वीकारणार आहेत.