Thu, Jun 27, 2019 15:44होमपेज › Konkan › काँग्रेसची घडी अद्याप विस्कटलेलीच

काँग्रेसची घडी अद्याप विस्कटलेलीच

Published On: Aug 26 2018 10:42PM | Last Updated: Aug 26 2018 10:30PMचिपळूण : खास प्रतिनिधी 

काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळून आता अनेक महिने उलटले तरी विस्कटलेल्या जिल्हा काँग्रेसची घडी अजूनही सावरलेली नाही. खा. हुसेन दलवाई यांच्या पुढाकाराने जिल्हाध्यक्ष म्हणून माजी आमदार रमेश कदम यांची वर्णी लागली असली तरी अजूनही जिल्हा काँग्रेसचे घोडे अडलेय तरी कुठे? असा सवाल आता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते करू लागले आहेत. 

पुढीलवर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या  आहेत. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने रमेश कदम यांचा प्रवेश करून घेत त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली. मात्र, त्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अजूनही सूर गवसलेला नाही, अशी कुजबूज आता काँग्रस पक्षाचे कार्यकर्तेच  करू लागले आहेत.

जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी दोन वेळा जिल्हा दौरा जाहीर केला. मात्र, दोन्ही वेळा हा दौरा रद्द करावा लागला. त्यामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. जिल्ह्यासाठी काँग्रेसने जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा कार्याध्यक्ष अशी पदरचना केली आहे. प्रभारी म्हणून कुणबी सेनेचे विश्‍वनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष कदम आणि कार्याध्यक्ष म्हणून आ. हुस्नबानू खलिफे यांची निवड केली आहे. मात्र, तिघांचा मेळ बसत नसल्याचे चित्र सध्या जिल्हा काँग्रेसमध्ये पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि विविध सेलची बांधणी अद्याप रखडलेली आहे. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते जागच्या जागी कायम असून राणे समर्थक मात्र स्वाभिमान पक्षात स्थिरावत आहेत. 

स्वाभिमान पक्षाचा नुकताच चिपळूणमध्ये मेळावा झाला. यावेळी सरचिटणीस निलेश राणे यांनी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून मंगेश शिंदे यांची निवड जाहीर केली. त्यावेळी शिंदे यांनी पक्ष संघटना बांधणी आणि सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प केला. त्यानंतर त्यांनी उत्तर रत्नागिरीचा दौराही केला. नवा पक्ष असताना त्यांनी संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. याउलट काँगेस पक्षाला इतिहास असताना आणि अनेक जुने निष्ठावान कार्यकर्ते जागोजागी असताना देखील काँग्रेसचे घोडे अडलेले का? असा सवाल आता पक्षाच्या कार्यकर्त्यानाच पडला आहे.

खरंतर माजी आ. कदम हे मुळात काँग्रेसच्या मुशीतून तयार झालेले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून पक्ष वाढविला. त्यानंतर शेकाप, भाजपा आणि पुन्हा काँग्रेस असा प्रवास केला  आहे. मात्र, जिल्हाध्यक्ष पद मिळूनही पक्षाच्या बांधणीला जोर का येत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. मध्यंतरी रमेश कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन 15 दिवसांत जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका आणि शहर कार्यकारिणी जाहीर करु, असे जाहीर केले होते. शिवाय त्याआधी घेतलेल्या मेळाव्यातही याचा उल्लेख केला होता. मात्र, याबाबत काँग्रेस मागे पडल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. 

अनेक दिवस काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र आता जिल्हाध्यक्ष मिळूनही पक्षातील मरगळ दूर झालेली नाही. अनेकजण काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असताना याबाबत काहीच निर्णय होत नसल्याने काँग्रेसचे घोडे अडलंय कुठे, असा सावल उपस्थित होत आहे.