Tue, Mar 26, 2019 21:56होमपेज › Konkan › सेना-भाजपच्या राजकारणात जनतेचा बळी: खा. दलवाई

सेना-भाजपच्या राजकारणात जनतेचा बळी: खा. दलवाई

Published On: Apr 23 2018 11:12PM | Last Updated: Apr 23 2018 9:07PMचिपळूण : प्रतिनिधी

प्रस्तावित नाणार प्रकल्पासाठी भूसंपादनाचा जारी केलेला अध्यादेश रद्द केला जाईल ही उद्धव ठाकरेंची घोषणा फसवी असून येथील जनतेने शिवसेनेचे राजकारण ओळखावे. भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करण्याची प्रक्रिया मोठी असून आपल्या कोर्टातील चेंडू भाजपच्या कोर्टात ढकलण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका खासदार हुसेन दलवाई यांनी चिपळूण येथील पत्रकारांशी बोलताना केली.

नाणार येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी भूसंपादनाचा अध्यादेश रद्द केला जाईल, अशी घोषणा केली. वास्तविक, त्यासाठी प्रथम कॅबिनेटची मंजुरी व त्यानंतर राज्यपालांची मंजुरी आवश्यक आहे. कॅबिनेटमध्ये भाजपचे बहुमत असून भाजपचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे. यामुळे शिवसेनेची ही घोषणा जनतेची फसवणूक व दिशाभूल करणारी आहे. शिवसेनेच्याच मंत्र्यांनी अधिसूचना जारी करताना स्थानिक जनतेचा विचार का केला नाही, असा सवाल त्यांनी केला. आता केवळ मतांचे मतलबी राजकारण खेळून शिवसेना जनतेच्या पाठी आपण असल्याचा आव आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

यावेळी खा. दलवाई यांनी, काँग्रेसचे शिष्टमंडळ नुकतेच या भागाच्या दौर्‍यावर येऊन गेले. त्यावेळी या भागामध्ये कोणतीही पडीक जमीन जाणवली नाही. प्रकल्पासाठी अधिग्रहीत केलेल्या जमिनीवर गावकर्‍यांची घरे, शिवाय शेतजमिनी व अनेक ठिकाणी बागायती आढळून आल्या. वास्तविक, प्रकल्पांसाठी शक्यतो पडीक जमिनी अधिग्रहीत करायला हव्या असताना तसे कोणतेही भान वा पथ्य या प्रकल्पाच्या जमिनी अधिग्रहीत करताना बाळगण्यात आले नाही. एकतर येथील जमिनी स्थानिक शेतकर्‍यांनी परप्रांतियांना केव्हाच विकल्या आहेत. त्यामुळे जमिनीचा भावही परप्रांतियांना मिळणार आहे. भूमिपुत्र मात्र या प्रकल्पामुळे व विशेषत: कोकणचा परिसर उद्ध्वस्त होणार आहे, हे पाप शिवसेनेचेच आहे, असा आरोप त्यांनी केला. स्थानिक जनतेसाठी शिवसेनेच्या नेत्यांनी कोणताही प्रक्रिया उद्योग आणला नाही. कोकणात मत्स्य प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोअरेज, मासेमारीसाठी आर्थिक सहकार्य, टेक्सटाईल मिल्स, गारमेंट उद्योग, अभियांत्रिकी उद्योग, ऑटोमोबाईल हब, आयटी पार्क व महत्त्वाचा पर्यटन उद्योग आर्थिक बदल घडवू शकतो. असे असताना रासायनिक उद्योग कोकणच्या माथी मारण्याचे पाप सेना-भाजपचे असून काँग्रेस पक्ष पूर्णपणे या प्रकल्पाच्या विरोधात आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.